धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात येणार का? तर मंत्री छगन भुजबळ यांनी केलं मोठं विधान; म्हणाले... (File Photo : Chhagan Bhujbal)
पुणे : महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच एका प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर धनंजय मुंडे हे पुन्हा मंत्रिपदावर येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. असे असतानाच यावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे.
पुण्यात छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं का? हा निर्णय मुख्यमंत्री आणि अजितदादा यांनी घ्यावा. धनंजय मुंडे यांना सगळी क्लीन चिट मिळाली का? जे आरोप होते ते वेगळे होते, त्याविषयी मी बोललो होतो. धनंजय मुंडे यांच्यावर जे गंडांतर आले, त्यावर निकाल लागला तर हे निश्चित होणार आहे. हा वाद मिटलाच पाहिजे’.
हेदेखील वाचा : मंत्रिमंडळातून ‘या’ चार नेत्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता, मुख्यमंत्र्यांना होईना सहन; संजय राऊतांचा मोठा दावा
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले होते. त्यानंतर जे काही घडलं त्यावरही भुजबळ यांनी भाष्य केलं. ‘थोडी चूक ‘छावा’च्या काही लोकांकडून झाली आणि मोठी चूक आमच्या लोकांकडून झाली. अध्यक्षांसमोर पत्ते टाकणे हे गैर होतं, ते रमी खेळत नव्हते. छावाचे काही कार्यकर्ते अजित पवारांनाही शिव्या देत होते. म्हणून तो सगळा पुढचा प्रकार झाला’.
राग कंट्रोल करता आला पाहिजे
यावर ते म्हणाले, राग कंट्रोल करता आला पाहिजे. सभ्य भाषेत विचारलं गेलं पाहिजे. अजित दादा भेटत असेल तर चांगली गोष्ट आहे. सांगलीतील कंत्राटदार हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणावर अजित पवार यांनी स्पष्ट उत्तर दिलेले आहे, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणं टाळलं.
मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले होते राजीनाम्याचे आदेश
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी खात्यातील घोटाळ्यांप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती समोर आली होती. देशमुख हत्याप्रकरणाचे धक्कादायक फोटो बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. तत्पूर्वी देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली होती, अशीही माहिती त्यावेळी समोर आली होती.