येऊर वन विभागातील लैंगिक अत्याचार घटनांवरुन आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
ठाणे : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आव्हाड यांनी येऊरमधील बलात्कारांच्या घटनांबाबत धक्कादायक विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन विभागामध्ये अनेकदा बेकायदेशीर प्रकार घडताना दिसतात. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी येऊरमध्ये 500 रुपये देऊन बलात्काराची परवानगी दिली जात असल्याचा मोठा दावा केला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन विभागामधील गैरप्रकारांवर आळा घालण्याची मागणी केली आहे. येऊर वन विभाग अतिशय संवेदनशील परिसर असताना अनेकदा तिथे रात्रीच्या वेळी तळीरामांची पार्टी रंगलेली असते. मागील काही वर्षांमध्ये या ठिकाणी बांधकाम देखील वाढले आहे. वनक्षेत्र असून अवैधरित्या बांधकाम केले जात असून यावर अंकुश घालण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दरम्यान, येऊर वन विभागामध्ये यापूर्वी देखील लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला आहे. यानंतर देखील या भागामध्ये कोणतीही सुरक्षा नसून या परिसरामध्ये सर्रास हे प्रकार चालू असल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मद्य परवाना दिलाच कसा जातो? याचे उत्तर उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी द्यावे. अनधिकृत बांधकामामध्ये बारचा आणि मद्याचा परवाना दिला जाऊ नये असा कायदा असतानाही तुम्ही कसा परवाना दिला असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
५०० रुपयांत बलात्कार करण्याची परवानगी
पुढे ते म्हणाले की, “ऊरमधील दोन बंगल्यांमध्ये दोन लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हे दोन्हीही बंगले बेकायदा आहेत परंतु ते बंगले का तोडले नाहीत. येऊरमधील वातावरणाला जबाबदार कोण? रात्री बाहेरील लोक तिथे सोडली कशी जातात. प्रश्न विचारल्यानंतरही तेथे रात्री लोकांना प्रवेश दिला जात होता. तेथे ५०० रुपयांत बलात्कार करण्याची परवानगी दिली जात आहे,” असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यापूर्वी देखील जितेंद्र आव्हाड यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. येऊरमध्ये सुरु असलेले प्रकार थांबवण्याची मागणी त्यांनी केली होती. जितेद्र आव्हाड यांची मुलगी नताशा हिने देखील या उद्यानाच्या बाहेर याच मुद्द्यांवरुन आंदोलन केले होते. पर्यावरण संरक्षणवादी लोकांसोबत तिने केलेल्या या आंदोलनामध्ये हॉटेल व्यवसायिकासोबत त्यांची बाचाबाची झाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.