'जागे व्हा...'; रोहित पवारांनी दिला अजित पवार-शिंदे गटाला इशारा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका केली जात आहे. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या राजकीय धोरणांवर जोरदार हल्लाबोल करत शिंदे आणि अजित पवार गटाच्या नेत्यांना ‘जागे व्हा’ असा इशाराही दिला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओसह त्यांनी भाजपकडून मित्रपक्षांना ‘संपविण्याच्या’ धोरणाची आठवण करून दिली. मित्रपक्षांच्या खांद्यावर हात ठेवून पाय बळकट करायचे आणि नंतर अॅनाकोंडाप्रमाणे गिळायचे, हे भाजपचे धोरण जगजाहीर आहे, असेही रोहित म्हणाले. रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये शिंदे गटाचे आमदार किशोरअप्पा पाटील यांचा व्हिडिओ शेअर करत उद्या अजितदादांचे आमदारही हीच भाषा वापरतील, असा टोलाही लगावला.
या व्हिडिओमध्ये शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील महायुती सरकारच्या एका वर्षाच्या कामगिरीवरून भाजपवर भडकले आहेत. व्हिडिओत पाटील म्हणाले, महायुती सरकारच्या एका वर्षात आमदारांना विकासकामांसाठी एक फुटकी कवडीही मिळाली नाही. भाजपकडून मित्रपक्षांना फक्त वापरून फेकून देण्याचे धोरण सुरू आहे. शिवसेना आणि इतर मित्रपक्षांना संपवण्याची भाजपची हीच पॉलिसी आहे. पाटील यांच्या या टीकेमुळे महायुतीतील विसंवाद पुन्हा उफाळून आला आहे.
सत्तेसाठी कुटुंब फोडले
तसेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना उद्देशून रोहित पवार पुढे म्हणाले, सत्तेसाठी कुटुंब फोडले आणि आता वापर संपल्यावर फेकण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. अजित पवारांचे निम्मे आमदार मनाने भाजपकडे गेले आहेत. शिंदे गटातील आमदारांनाही खिंडीत पकडण्याची मोहीम सुरू आहे. हे भाजपचे कुबड्याविरहित राजकारण आहे. आता कुबड्यांनीच ठरवावे, दुसऱ्याचे ओझे किती दिवस वहायचे?, असा सवालही त्यांनी केला.
हेदेखील वाचा : “तुमच्या मतदानाच्या ढळढळीत अपमानाचा…”; निवडणूक लागताच Raj Thackeray यांनी दिली प्रतिक्रिया






