(Photo - X)
MLC Election 2026 : राज्याच्या राजकारणात विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचा धुरळा उडाला आहे. विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. शिवसेना शिंदे गटाला एक जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 2 जागा तर काँग्रेसनेही एका जागेवर विजय मिळवला. या निकालानंतर महायुतीत खडाजंगी सुरु झाल्याचे दिसत आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अश्यातच भाजप मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेना शिंदे गटातील नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे.
नितेश राणे यांनी आज (29 ऑकटोबर, गुरुवार) पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विधान परिषद निवडणुकांच्या निकालावर भाष्य केले. “महायुतीत काही उद्धव ठाकरेंचे मातोश्रीप्रेमी तर राहिले नाहीत ना?” असं खोचक विधान करत शंका उपस्थित केली. यावरून आता महायुतीत पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नसल्याची चर्चा सुरू आहे. पाच जागांपैकी भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळाला. या निकालानंतर भाजपच्या पराभवावरून राजकीय आरोप सुरू झाले. शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी भाजपच्या उमेदवारावर टीका केली. त्याला उत्तर देताना नितेश राणेंनी महायुतीतील काही नेत्यांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले.
पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले की, “शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेते एकत्र बसून या घटनांवर चर्चा करतील. जिथे आवश्यक असेल तिथे योग्य ती पावलं उचलली जातील,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी महायुतीत राहून उद्धव ठाकरे यांच्या बाजूने काम करणारे काही लोक आहेत का, अशी शंका व्यक्त केली. ‘शकुनीमामा’ असा उल्लेख करत काही जण मुद्दाम काड्या लावत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. दुसऱ्यांच्या पक्षातील घडामोडींवर भाष्य करण्यापेक्षा आधी स्वतःच्या पक्षाच्या तीन उमेदवारांना किती मतदान मिळालं, याबद्दल बोलावं, असं आव्हान त्यांनी दिलं.
काँग्रेसच्या कामगिरीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. एका अपक्ष उमेदवाराच्या विजयावर जल्लोष करण्याची वेळ काँग्रेसवर आली असल्याचा टोला त्यांनी लगावला.
निवडणुकीच्या निकालानंतर मित्रपक्षांमध्ये सुरू झालेली ही शाब्दिक चकमक आगामी काळात कोणतं वळण घेते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. वरिष्ठ नेते एकत्र बसून हा वाद मिटवतात की आरोप-प्रत्यारोप आणखी वाढतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






