चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद (फोटो- ट्विटर)
पुणे: शहर ज्या वेगाने वाढत आहे, तसे सामजिक, राजकीय आणि सार्वजनिक प्रश्न देखील वाढत आहेत. मागील पावणे तीन वर्षे नगरसेवक नसल्याने नागरी समस्यांकडे लक्ष दिले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. महापालिका प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी दोन स्वतंत्र महापालिका करण्याचा निर्णय घेण्यास फारसा विलंब लावून उपयोग नाही. येत्या १५ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेवून यासह अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ‘व्हिजन २०२५’ या अंतर्गत पुणे शहरातील नवनिर्वाचित आमदारांशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोथरूडचे आमदार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्वतीच्या आमदार तथा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर, हडपसर चे आमदार चेतन तुपे, शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी सर्व आमदारांनी शहरातील सार्वजनिक वाहतूक, पाणी पुरवठा, शिक्षण, स्वच्छ्ता आदींबाबत उहापोह करत येत्या काळात या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासित केले.
महायुतीचे सरकार आले आहे. २०१४ ते १९ पर्यंत विकासाची कामे केली व सुरू केली ती पुढेही सुरूच राहील. मेट्रोची चर्चा व्हायची आता मेट्रो सुरू झाली आणि नवीन मार्ग तयार होवू लागले आहेत. अनेक रेल्वे सुरू केल्या. त्यामुळे पुण्याच्या सुविधांसाठी २०५० ची वाट पाहावी लागणार नाही. ३४ गावांना लागणारे रस्ते, पाणी आदी काम सरकारकडे आहे. कात्रज परिसरात बंधारा बांधून दक्षिण पुण्याला पाणी उपलब्ध करून देता येईल. यासाठी सर्वेक्षण व प्लॅनिंग सुरू आहे. विकास करताना शहर बकाल झालं नाही पाहिजे. यासाठी ‘एसआरए’ नियमावली बदल करत आहोत. पहिली खासगी तत्त्वावर सरकारी जागेवरील योजना पर्वतीमध्ये सुरू होत आहे.
-माधुरी मिसाळ, राज्यमंत्री
वाहतुकीचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू: शिरोळे
पहिल्या टर्म मध्ये अभ्यास करायला संधी मिळाली. पुण्यात ट्रॅफिकची समस्या आहे. रिंग रोडचे काम लवकर सुरू होईल. पुण्यातील ताण कमी होवून अर्थ व्यवस्थेला चालना मिळेल. शिवाजीनगर मेट्रो २०२५ मध्ये सुरू होईल यासाठी प्रयत्न. विद्यापीठ चौकातील पुलाचे काम पूर्ण होत आहे. दोन भुयारी मार्ग आहेत त्यांचेही काम पुढील वर्षभरात पूर्ण होईल. ट्रॅफिक वर येत्या दोन वर्षात काम पूर्ण होईल. पिम्पी चे फिडर सर्व्हिसेस काम करायचे आहे. मेट्रोचा अधिक वापर होईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.
रस्त्यांची कामे प्राधान्याने करावीत: पठारे
दोन रिंग रोडच्या आतच पुण्याची हद्द राहावी. कुठेही गेले तरी प्लॉटींग होत आहे. त्यांना पाणी कोठून देणार. बांधकाम परवानगी दिली जाते. बिल्डर बांधून मोकळे होतात. नागरिक आमच्याकडे येतात. ही वाढ कुठे तरी निश्चित केली पाहिजे. रिंग रोड तयार करताना अंतर्गत कनेक्ट करण्यासाठी रस्ते विकसित झाले पाहिजेत, असे मत आमदार बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केले.
मेट्रो भूयारीच असावी – तुपे
शहरात वाहतूक समस्या आहे. रोड, ब्रीज हे यावरील उत्तर नाही. यासाठी सार्वजनिक वाहतूक सुधारली पाहिजे. शहरची भौगोलिक व्यवस्था लक्षात घेवून मेट्रो चे जाळे निर्माण गेले पाहिजे. एकही रस्ता ३० मी नाही. छोट्या रस्त्यावर मेट्रो केल्यास बाजूच्या रस्त्यावर गर्दी होते. खर्च वाढला तरी मेट्रो भुयारी झाल्यास वाहतूक सुटसुटीत होईल. पुण्याच्या भोवतीचा रिंग रोड लवकर झाला पाहिजे, असे मत आमदार चेतन तुपे यांनी व्यक्त केले.
आम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी जबाबदारी दिली आहे. शहराचा विकास आराखडा झाला. त्याची अमलबजावणी होत नाही. रस्ते गायब झाले आहेत. मनपा जागा ताब्यात घेत नाही. त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. मी खडकवासला ते खराडी मेट्रोसाठी पाठपुरावा करत आहे. राज्याकडून केंद्राकडे पाठवण्यासाठी प्रयत्न आहे. ती पुढील पाच वर्षात सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा करणार आहे
– भीमराव तापकीर, आमदार