इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : देशाच्या माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेस नेत्या इंदिरा गांधी यांच्या आणीबाजीच्या निर्णयाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या निर्णयाने संपूर्ण देशावर मोठा फरक केला होता. या निर्णयाला आता 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे भाजप नेत्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आणीबाणीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आणीबाणीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपला कुठल्याही गोष्टीचा उत्सव आणि राजकारण करायला मजा येते. ते कशाचाही उत्सव साजरा करतात. ट्रम्प यांनी मोदींना युद्ध थांबवायला सांगितलं, भाजप त्याचाही उत्सव साजरा करतील. भाजपला नौटंकी करण्याची नशा आहे. त्यांनी पहलगाम हल्ल्यात जे झालं त्याचाही राजकारणासाठी उत्सव केला, असा टोला खासदार राऊतांनी लगावला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. माझा तुम्हाला प्रश्न आहे की आणीबाणीचा दिवस संविधानाची हत्या दिवस म्हणून तुम्ही कसा काय साजरा करू शकता? आमच्या संविधानात आणीबाणीची तरतूद आहे. जेव्हा देशाला बाहेरच्या शक्तिकडून धोका असेल, अराजकता निर्माण करू पाहत असेल तर राष्ट्रपतींच्या सहीने तुम्ही आणीबाणी लागू करू शकता,” अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.
पुढे ते म्हणाले की, “निवडणुकीत हेराफेरी करून इंदिरा गांधी जिंकल्या असत्या. पण आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांनी निवडणूक जाहीर केली. निवडणूक हरल्या हा पराभव त्यांनी स्विकारला. आज असं होतना दिसतं का? गेल्या 11 वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी आहे. इंदिरा गांधी या स्वतः अटल, आडवाणी यांना फोन करत होत्या. इथे मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं आहे. कोर्टाने त्यांना निर्दोष सांगत सोडून दिलं. ही आणीबाणी नाहीये का? हे आणीबाणीचा बाप सुरू आहे, इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली होती, पण मोदी सरकारने अघोषित आणीबाणीत सर्वांना चिरडलं,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे राऊत म्हणाले की, “भूतकाळात जे झालं त्याला विसरून पुढे गेलं पाहिजे. संघाचे तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणिबाणीला पाठिंबा दिला होता, देवरसांना इंदिरा गांधी यांनी जरूर अटक केली होती, पण तुरुंगातून जो इंदिरा गांधी यांना पत्रव्यवहार केला होत फार इंटरेस्टिंग आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरता तुम्ही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचे खुलं समर्थन केलं होतं. आमच्या मार्मिक प्रेसवर धाड घालून प्रेस बंद केली होती. तरी आम्ही समर्थन दिलं होतं. आणिबाणी ही शिस्त लावणारी व्यवस्था होती,” असा मोठा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.