ठाण्यात माजी मंत्र्याच्या एंट्रीने शिंदेगट-महायुतीत फूट पडणार
Thane Politics: ऱाज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणूका आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांपूर्वी भाजप, शिंदे सेनेत जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. पण दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि इतर पक्षांतील नेत्यांमध्ये फूट पाडून आपला पक्ष वाढवण्यात व्यस्त आहेत. पण त्याचवेळी महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचीच नजर एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यावर आहे. त्यातच भाजप मंत्री गणेश नाईक सध्या ठाण्यात चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्या ठाण्यात होणाऱ्या सततच्या जनता दरबाराने मात्र एकनाथ शिंदे अस्वस्थ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून एकनात शिंदे आणि भाजपमधील दुरावा वाढत चालल्याचे दिसत आहे. त्यांच्यातील मतभेद अनेकदा चव्हाट्यावरही आल्याचे पाहायला मिळाले. नवी मुंबईत वर्चस्वावरून शिवसेना खासदार नरेश म्हस्के आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातही शाब्दिक चकमकी झाल्या. वनमंत्री गणेश नाईक शुक्रवारी (२२ ऑगस्ट) ठाणे शहरात सार्वजनिक दरबार आयोजित करत आहेत. २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सार्वजनिक दरबाराचे बॅनर आणि पोस्टर्स शहरात सर्वत्र लावण्यात आल्यामुळे शिवसेनेची अस्वस्थता वाढली आहे. यापूर्वी, हा सार्वजनिक दरबार ठाणे स्टेशनपासून दूर डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणार होता, परंतु म्हस्के यांच्या विधानानंतर, स्थळ बदलून गडकरी रंगायतन करण्यात आले.
गणेश नाईक यांच्या सार्वजनिक दरबाराच्या माध्यमातून भाजपही आपली शक्ती दाखवू इच्छित आहे. याबाबत ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष संदीप लेले तसेच माजी खासदार संजीव नाईक यांची टीम पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. ठाणे शहर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानले जाते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपली ठाण्यात आपली ताकद दाखवून दिली.
दरम्यान, भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र आणि माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी लोकसभा निवडणुकीची पूर्ण तयारी केली होती. परंतू एकनाथ शिंदेंच्या दबावामुळ नरेश म्हस्के यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली.निवडणुकीत ते निवडूनही आले. तेव्हापासून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारणही अधूनमधून सुरू असते.
ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार, या महिन्याचा पगार आधीच मिळण्याची शक्यता
अलिकडेच शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांच्या वयाबद्दल विधान केले होते. म्हस्केंची टीका नाईकांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. म्हस्के यांच्यामुळे गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक खासदार होऊ शकले नाहीत, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यातही अडथळे निर्माण केले. आता महापालिका निवडणुकीत गणेश नाईक भाजपवर स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी दबाव आणत आहेत. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही त्यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा गणेश नाईक यांच्या जनता दरबाराकडे लागल्या आहेत.