खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कॉंग्रेसने सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शिवसेना ठाकरे गट सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. केंद्र सरकारने अद्याप हल्ल्याला प्रत्युत्तर न दिल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच पहलगाम हल्ल्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने उत्तर न दिल्यामुळे कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “बारा दिवस होऊन गेले, आमचे 27 लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेले. याला बारा दिवस झाले आणि बदला काय घेतला? रोज बातम्या येतात, या नाड्या आवळल्या, त्या नाड्या सोडल्या, 21 यूट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे, पाकिस्तानच्या हाय कमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारीवर्ग कमी करा याला बदला घेणं म्हणतात का? तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता? त्यांचे पक्ष फोडता, त्यांना तुरुंगात टाकता, त्यांचे आयुष्य उध्वस्त करता, त्यांच्या कुटुंबाचा छळ करतात. पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवळल्या, त्या नाड्या आवळल्या, एअर स्पेस बंद केले, याला बदला म्हणतात का? 27 लोक मारले गेल्यावर बदला कसा पाहिजे… इंदिरा गांधींचा इतिहास पाहा. त्यांना नेहरू आणि इंदिरा गांधींचा त्रास होतो. हे कोणाला मूर्ख बनवत आहेत?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “प्रधानमंत्री हे नुसते फिरत आहेत. इकडून तिकडे तिकडून इकडे, मिठ्या मारत आहेत. लोकांना याला बदला घेणं म्हणत नाही. भीती वाटते मला या देशाची आता. अशा प्रकारचे राज्यकर्ते या देशात असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय युट्युब चॅनेल बंद करायचे. हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुन चुन कर मारण्याचा प्रयत्न करत आहेत. तेही आता शक्य नाही. बारा दिवस झाले तरी हे बदला घेत आहेत आणि आता हे युद्ध सराव करत आहेत,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता हा आता मे महिन्याच्या सुरुवातीला खात्यामध्ये जमा होत आहे. यावरुन देखील राऊत भडकले. ते म्हणाले की, “लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे. आता पाचशे रुपये देत आहेत, 1500 वरून 500 वर आले. प्रचारात 2100 रुपये देण्याचे बोलले होते. अजित पवार बोलत होते मी नाही बोललो कर्जमाफी मी कुठे बोललो? सरकार तुमचं आहे. तुम्ही त्या सरकारमध्ये आहात. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. प्रत्येक मंत्री बोलत आहे माझा पैसा, माझा पैसा… तुमचा पैसा कुठला? एक मंत्री आहेत माझ्या खात्याचा पैसा वळवला, लाडक्या बहिणींना दिला ना? तुम्हाला कशाला पाहिजे पैसा?” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे दिले म्हणून तुम्ही रडत आहात. आधी कसे हसत होतात मत पाहिजे म्हणून खिशातला पैसा वळवला का? सरकारी पैसा आहे याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींना देखील फसवत आहात. तुमचे जे सामाजिक विभागाचं जे कार्य आहे त्याची फसवणूक करत आहे. चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकीट मारी केली होती आणि आता ही पाकीट मारी करणं सोपं नाही. अजित पवार तिकडे बसलेले आहेत खंबीर. अजित पवार एक अर्थमंत्री म्हणून खामक्या माणूस आहे, आम्ही पाहिलेलं आहे,” असे देखील मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.