पाकिस्तानी खेळाडू साहिबजादा फरहान मैदानात AK-47 ॲक्शन केल्यामुळे संजय राऊत भडकले(फोटो - सोशल मीडिया)
Sanjay Raut News : मुंबई : देशामध्ये आजपासून नवीन जीएसटी दर लागू झाले आहेत. यापुढे देशांमध्ये केवळ दोन टॅक्स स्लॅब असणाऱ्या आहेत. यामध्ये 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच स्लॅब असणार आहे. यावरुन सत्ताधाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे तर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र डागलं आहे. विरोधकांनी यापूर्वी असलेल्या टॅक्स स्लॅबवरुन टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. आम्हालाही अर्थशास्त्र कळतं हा सगळा खोटारडेपणा असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, “साधारण दोन लाख कोटींची ही सवलत मोदींनी दिली. 140 भारतीय नागरिकांना त्याच्यामध्ये वर्षाला 1213 रुपये त्यांना फायदा होणार आणि महिन्याला 110 ते 120 रुपये इतकाच लाभ मिळत आहे. आम्ही बघितलं, आम्हालाही अर्थशास्त्र कळतं. हे सगळं करण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांनी आम्हाला आमचे 15-15 लाख रुपये दिले असते तर ते सोयीचं ठरलं असतं. हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत,” असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वाजता देशवासियांना संबोधले. यानंतर संध्याकाळी क्रिकेट सामना असल्यामुळे लवकरची वेळ घेतली असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. ते म्हणाले की, “एरवी प्रधानमंत्री आठ वाजता बोलतात. आठ वाजता ही त्यांची देशाला धक्का देण्याची वेळ आहे. काल पाच वाजता का बोलले? काल ते पाच वाजता यासाठी बोलले की, देशाने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहावा. किती महान राष्ट्रभक्त आहेत. आठ वाजता क्रिकेट सामना अंध भक्तांना पाहता यावा, भाजपा समर्थकांना पाहता यावा म्हणून काल प्रधानमंत्री यांनी पाच वाजता जीएसटीची घोषणा केली. आठ वाजता त्यांना क्रिकेट मॅच पाहायची होती, काल स्वतः जय शाह मुंबईत होते, असे माझी माहिती आहे,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “काल भारत-पाक सामना जो खेळला गेला त्यात साहिबजादा फरहान नावाचा कोणीतरी क्रिकेटपटू आहे. त्याचे अर्धशतक झाल्यावर मैदानावर हातामध्ये बॅट घेऊन गोळ्या मारत आहेत अशी जी ऍक्शन केली ती कोणासाठी? का? त्याने दाखवलं अशाच प्रकारे AK-47 चा वापर करून पाकिस्तानी यांनी अतिरेकी यांनी पहलगाममध्ये तुमच्या लोकांना ठार केलं. त्यांनी प्रतिकात्मक रित्या दाखवलं आणि जय शाहांसह संपूर्ण भारतीय संघ हे थंडपणे पाहत होता. पहिला सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पाकच्या क्रिकेटच्या कॅप्टनशी शेकहँड केलं नाही. त्याचं काय कौतुक म्हणून मग काल हे कृती केल्यावर सूर्यकुमार यादवने तो जो कोणी फरहान आहे ना त्याच्या कंबरड्यात तिथेच लाथ घातली पाहिजे होती. हे सगळं या देशाला भोगावं लागत आहे. अमित शाह आणि जय शाह यांच्यामुळे. जय शाहांला भारतरत्न दिला पाहिजे, इतकं महान राष्ट्रभक्तीचे कार्य करत आहे,” असा आक्रमक पवित्रा खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे.