मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता कधी येणार याबद्दल सांगितलेय (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीला मंजूरी देखील दिली आहे. त्यामुळे नवीन वर्षाचा पहिला हप्ता लवकरच लाडक्या बहीणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये दरमहिना जमा होणार आहेत. त्याप्रमाणे आत्तापर्यंत 8 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. आता लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. गुरुवारी मंत्री परिषदेची बैठक पार पडली. या वेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा प्रलंबित हप्ता देण्यासाठी 3690 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या 26 जानेवारीपासून दिला जाणार आहे. याबाबत महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे लवकरच लाडक्या बहीणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होणार आहेत. लाडक्या बहीण योजनेसाठी अर्जाची छाननी आणि फेरतपासणी करणे सुरु आहे. निवडणुकीपूर्वी सर्व महिलांना सरसकट पैसे देण्यात आले होते. मात्र निकालानंतर अनेक महिलांचे अर्ज आता रद्द केले जात आहेत. पात्रतेमध्ये न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत. यामध्ये चार चाकी गाडी असलेल्या आणि इतर सरकारी योजनेंचा लाभ घेत असल्याचे अर्ज रद्द केले जात आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
2100 रुपयांचा हप्ता कधीपासून?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीकडून पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर 2100 रुपये दर महिना दिले जातील असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पुन्हा महायुती सरकार आल्यानंतर अर्थसंकल्पानंतर वाढीव हप्ता दिला जाईल असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची तारीख जाहीर केली आहे. येत्या 3 मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. तर येत्या 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. यामध्ये लाडक्या बहीणींसाठी 2100 रुपये दर महिना देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्चनंतर लाडक्या बहीणींना 2100 रुपये दर महिना मिळण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नवीन योजनेबाबत अनेक निर्णय घेतले. यावेळी फडणवीस म्हणाले की,राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर ५३६ सेवा उपलब्ध असून संबंधित विभागाच्या संकेतस्थळांवर ९० सेवा आहेत. मात्र ३४३ सेवा ऑफलाइन पद्धतीने दिल्या जातात. या सर्व सेवा ‘आपले सरकार ’ संकेतस्थळावर उपलब्ध करून द्याव्यात व त्यासाठी माहिती-तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा. हे काम १०० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. अनेक सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या नाहीत. त्यासाठी संबंधित मंत्री आणि सचिवांनी पुढाकार घ्यावा. नागरिकांना ९९ टक्के शासकीय सेवा मोबाईलवर उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे मत देवेंद्र फडणवीस यांंनी व्यक्त केले आहे.