विरोधी पक्षनेते पदावरुन नाना पटोले व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वाद झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभेच्या निकालानंतर लगेचच हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. महायुतीकडे एकतर्फी निकाल लागला असला तरी सत्तास्थापनेसाठी आणि मंत्रिमंडळ विस्तारासाठी विलंब झाला आहे. यामुळे महायुतीमध्ये देखील अनेक नेते नाराज आहेत. महायुतीसह आता महाविकास आघाडीमध्ये देखील नाराजीनाट्य सुरु असल्याचे चित्र आहे. विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी कमीत कमी नेते देखील महाविकास आघाडीच्या कोणत्याच घटक पक्षाकडे नसल्यामुळे या पदाबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीमधील कॉंग्रेस व शिवसेना ठाकरे गटामध्ये विरोधी पक्षनेतेपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे स्पष्ट आहे.
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. काल (दि.17) शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये दाखल झाले होते. याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीसांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. तसेच मुख्यमंत्री झाल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचे अभिनंदन केले. निवडणुकीनंतर ही पहिलीच भेट असल्यामुळे अनेकांनी विविध तर्क वितर्क लावले त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. विरोधी पक्षनेते संदर्भात राहुल नार्वेकर निर्णय घेणार असल्यामुळे उद्धव ठाकरे यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यावरुन आता कॉंग्रेस नेते नाना पटोले हे आक्रमक झाले आहेत.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महाविकास आघाडीमधील कोणत्याही घटक पक्षाकडे विरोधी पक्षनेतापद घेण्याऐवढे देखील जागा नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर व देवेंद्र फडणवीस यांना भेटून विरोधी पक्षपदाचा प्रस्ताव ठेवला असल्याचे बोलले जात आहे. परस्पर भेट घेतल्यामुळे नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेमध्ये नाराजीचा सूर उमटलेला दिसून येत आहे.
कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शिवसेनेचा आकडा आमच्यापेक्षा मोठा आहे. त्यांचे २० आमदार आहेत, तर आमचे १६. त्यामुळे स्वाभाविक त्यांचं नाव येणारच. पण यावर एकत्र बसून चर्चा हईल, अशी अपेक्षा होतील. पण त्यांनी स्वंतत्र जाऊन चर्चा केली तर काही बोलणार नाही,” असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. यामुळे नाना पटोले यांना उद्धव ठाकरे यांची परस्पर भेट पटली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे नाना पटोले म्हणाले की, “विरोधी पक्षनेतेपदाचा सर्व निर्णय हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. यामुळे विरोधी पक्षनेतपदी नेमणूक करायची की नाही या सर्वस्वी अधिकार हा नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सल्लामसलत करून नार्वेकर पुढील निर्णय घेतील. उद्या अध्यक्षांनी ठरविल्यास विरोधी पक्षनेत्याची निवड होऊ शकते. कारण राज्यात तसा पायंडा आहे,” असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.
तर विरोधी पक्षनेते पदाबाबत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, “विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे असल्याने विधानसभेत ते काँग्रेसला मिळावे, असे त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटत आहे. पण ठाकरे निर्णय का घेत नाहीत, याचे कोडे असून शपथविधी, विस्तार आणि खातेवाटपाला विलंब झाला. मग आम्ही थोडावेळ घेतला, तर बिघडले कुठे,” असा प्रतिसवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस व राहुल नार्वेकर यांची घेतलेली भेट कॉंग्रेस नेत्यांना पटली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.