नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा मतदारसंघातच तळ; दादा भुसेंसह गिरीश महाजनही राजकीय मैदानात... (संग्रहित फोटो)
नाशिक : नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील अकराही नगरपालिकांचे चित्र स्पष्ट झाले असून, उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे व भाजपचे गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील काही नगरपालिकांमध्ये लक्ष घालून पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. असे असताना मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी मात्र स्वतःच्या मतदार संघापुरते प्रयत्न चालवून जिल्ह्यातील उमेदवारांना वाऱ्यावर सोडल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दादा भुसे यांनी गेल्या चार दिवसांपासून इगतपुरी, भगूर, येवला, ओझर या नगपालिका क्षेत्रात दौरे करून तेथील कार्यकर्ते व उमेदवारांच्या पाठीशी आपले बळ उभे करून पक्षाच्या विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पदाधिकाऱ्यांची बैठक व व्यूहरचना आखली जात असून, भाजपचे गिरीश महाजन यांनीही ओझर, पिंपळगाव बसवंत, चांदवड नगरपालिकांना भेटी देऊन कार्यकर्त्यांना तसेच उमेदवारांना प्रोत्साहित केले आहे. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव व मनमाड नगरपालिकेवर लक्ष केंद्रीत केले असून, त्यांच्या प्रयत्नाला बऱ्यापैकी यश येऊन काही जागा बिनविरोध करण्यातही त्यांना यश आले आहे.
दरम्यान, अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांनी भगूर नगरपालिकेवर लक्ष केंद्रीत केले आहे. हिरामण खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर नगरपालिका, इगतपुरीसाठी बैठकांवर जोर दिला आहे. माजी खासदार समीर भुजबळ हे येवला व मनमाड नगरपालिकेसाठी तळ ठोकून असून, येवल्यात विरोधकांचा पाठिंबा मिळविण्यात त्यांना यश मिळाले आहे.
राष्ट्रवादीचे मंत्री नावापुरतेच
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन मंत्री असून, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ हे रूग्णालयात दाखल आहेत. माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ यांनी मात्र स्वतःला मतदार संघापुरतेच बांधून ठेवले आहे. मतदारसंघातील सिन्नर नगरपालिकेसाठी त्यांनी स्वबळावर उमेदवार उभे केले असले तरी त्यांना पूर्ण यश मिळालेले नाही. तर झिरवाळ यांच्या मतदारसंघात कोणतीही निवडणूक नसल्यामुळे जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीपासून स्वतःला दूर ठेवले आहे.
नगरपालिकेच्या प्रचारासाठी दिवस शिल्लक
नगरपालिकेच्या प्रचारासाठी दिवस शिल्लक असून, २ डिसेंबर मतदान घेण्यात येणार आहे. अखेरच्या टप्प्यातील प्रचाराला सोमवारपासून सुरू होईल. प्रत्येक उमेदवाराची मतदारांनी पोहोचण्यासाठी धडपड सुरू आहे. यावेळी पक्ष पातळीवरून उमेदवार व कार्यकर्त्यांपर्यंत रसद पुरविण्यासाठी अपवाद सोडता पक्षाच्या नेत्यांनी फरविल्याचे चित्र आहे.
हेदेखील वाचा : Pune Municipal Elections: प्रारूप यादीत मतदारांची पळवापळवी; तीन लाख मतदारांवर प्रश्नचिन्ह, मतदारांकडून हरकतींचा भडिमार






