संग्रहित फोटो
अजितदादांनी अनेक वर्षे बारामतीच्या विकासासाठी घेतलेली धडपड, राबवलेली विविध प्रकल्पांची स्वप्ने आणि सर्वसामान्यांशी ठेवलेला जिव्हाळ्याचा संवाद यामुळे ते प्रत्येकाच्या मनात घर करून होते. त्यांच्या अकस्मात अपघाती मृत्यूने शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला. महिनाभर उलटून गेला तरी बाजारपेठा, चौक, गावोगावी अजूनही त्यांच्या आठवणींचीच चर्चा रंगताना दिसते.
गेल्या काही दिवसांत विविध सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अनेक ठिकाणी मेणबत्ती प्रज्वलन, सामूहिक प्रार्थना आणि मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. “दादा होते म्हणून आम्हाला आधार होता,” अशी भावना व्यक्त करत अनेकांनी डोळ्यांत अश्रू आणले.
कुटुंबातील व्यक्ती निघून गेल्यानंतर जशी पोकळी निर्माण होते, तशीच पोकळी आज बारामतीत जाणवत आहे. विकासकामांची गती, प्रशासनातील निर्णयप्रक्रिया आणि सर्वसामान्यांशी असलेला थेट संवाद, या साऱ्यांमध्ये दादांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते. वृद्धांपासून युवकांपर्यंत सर्वच स्तरांतून “दादांची उणीव भरून निघणे अशक्य” अशी प्रतिक्रिया उमटत आहे. काळ जरी पुढे सरकत असला, तरी अजितदादांच्या आठवणी, त्यांचे कार्य आणि त्यांच्याविषयीची आत्मीयता बारामतीच्या हृदयात कायम जिवंत राहणार आहे.
हे सुद्धा वाचा : वाहनचालकानो सावधान! थकित दंडाची रक्कम 30 दिवसात भरा, नाहीतर…; पुणे पोलिसांचा इशारा
पुण्यस्मरण कार्यक्रम
अजितदादा पवार यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बारामती येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमास सकाळी ६.०० वाजता भजनाने सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ७.०० वाजता भक्तीगीत, सकाळी ८.०० वाजता सर्वधर्मीय प्रार्थना आणि सकाळी ८.४५ वाजता श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम तिरंगा सर्कल, नटराज कला दालन, बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे.






