'विनायक राऊत यांचं तोंड काळं झालं'; सुनेच्या आरोपांनंतर निलेश राणेंचा घणाघात; 'अजून धक्कादायक गोष्टी समोर येतील,' राणेंचा दावा
शिवसेना (ठाकरे गट)चे नेते आणि सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांच्या सून गिरीजा यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत विनायक राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
निलेश राणे म्हणाले, “असे प्रकार विनायक राऊत सातत्याने करत असल्याचे आम्ही ऐकत होतो. आता त्यांच्या घरातील लोकांनीच हे प्रकार बाहेर आणले आहेत. त्यामुळे आता त्यांनी इतरांवर बोट दाखवू नये.”
राणे यांनी आरोप केला की, विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाने केलेले कथित कृत्य अत्यंत लाजिरवाणे असून त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी झाली आहे. “हे कोणाचे षडयंत्र नाही, तर त्यांनी केलेल्या कृत्यांचे परिणाम आहेत. अशा प्रकरणानंतर त्यांनी सार्वजनिकपणे बोलणे टाळावे,” असेही राणे म्हणाले.
निलेश राणे यांनी पुढे दावा केला की, या प्रकरणात अजून अनेक बाबी समोर येऊ शकतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, “अनेक लोक आता त्यांच्याविरोधात बोलतील. तक्रार करणाऱ्यांकडे अजूनही अनेक गोष्टी आहेत. तपासातून जे समोर येईल ते धक्कादायक असेल.”
मनी लाँड्रिंगच्या मुद्द्यावर बोलताना निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावरही आरोप केले. त्यांनी दावा केला की, तपासातून अनेक बाबी उघड होऊ शकतात. तसेच “विनायक राऊत माझ्यासाठी झिरो आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली.
निलेश राणे म्हणाले, “गेल्या 20-20 वर्षांपासून काही लोकांनी केवळ राणेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा, समाजात बदनामी करण्याचा आणि त्यांच्या मागे विविध यंत्रणा लावण्याचा प्रयत्न केला. एखाद्याबद्दल किती वाईट करायचे यालाही काही मर्यादा असते. पण आज आम्हाला त्यांच्याविरोधात काहीही करावे लागले नाही. नियतीनेच त्यांना असा धडा शिकवला की ते स्वतःच आपल्या घरातून ‘हिट विकेट’ झाले आहेत.”
पुढे बोलताना निलेश राणे यांनी नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत, “राणे कुटुंब कधीही असले नको ते धंदे करत नाही आणि आमच्याकडे अशा गोष्टींसाठी वेळही नाही,” असे म्हटले.
कार्यकर्ते आणि राजकीय विरोधकांना उद्देशून त्यांनी, “नियती कोणालाही माफ करत नाही. त्यामुळे राणेंशी चांगले राहा,” असा सूचक इशाराही दिला.






