'26/11 च्या वेळी गिरीश महाजन बंदूक घेऊन रस्त्यावर उतरले होते, हे मला आठवत नाही'; गिरीश महाजनांचा दावा एकनाथ खडसेंनी फेटाळला
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान आपण बंदूक घेऊन दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी रस्त्यावर उतरलो होतो, मात्र एकनाथ खडसेंनी काळजीपोटी रोखले, असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. या दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत तो फेटाळून लावला आहे.
खडसे म्हणाले, “माझी स्मृती ठीक असेल तर त्या काळात माझी आणि गिरीश महाजन यांची कुठलीही भेट झाली नव्हती. त्यामुळे 26/11 च्या वेळी ते बंदूक घेऊन रस्त्यावर उतरले होते, हे मला तरी आठवत नाही.”
‘लाडक्या बहिणींसाठी नव्हे, मतांसाठी योजना होती का?’; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात
एकनाथ खडसे यांनी सांगितले की, 26/11 च्या हल्ल्यावेळी ते नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका गावात होते. तेथे दूरदर्शन किंवा इतर संपर्काची सुविधा नव्हती. नंतर जयकुमार रावल यांच्या गावी जाऊन त्यांनी घटनेची माहिती घेतली.
यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा वायरलेसवरून फोन आल्यानंतर तातडीने बैठकीसाठी बोलावण्यात आले. त्यावेळी वाहन उपलब्ध नसल्याने छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आलेल्या छोट्या विमानातून ते दुसऱ्या दिवशी मुंबईला पोहोचल्याचे खडसे यांनी सांगितले.
खडसे यांनी स्पष्ट केले की, त्या काळात त्यांची आणि गिरीश महाजन यांची कुठेही भेट झाली नव्हती. त्यामुळे महाजन यांनी केलेल्या दाव्याला कोणताही आधार नसल्याचे त्यांनी सूचित केले.
दरम्यान, एकनाथ खडसे पुन्हा भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अलीकडेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर या चर्चांना अधिक जोर आला आहे. खडसेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा रंगली असली, तरी याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.






