Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपदाची ऑफर अन् अमित शाहांकडूनच भाजपची ऑफर; बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा
Maharashtra Politics: भाजपमध्ये पुर्नप्रवेशाच्या चचर्चादरम्यान ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः फोन करून भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. वाढदिवसानिमित्त भाजपमध्ये त्यांचा जाहीर प्रवेश होणार असल्याच्या चर्चावर प्रतिक्रिया देताना खडसे यांनी दिल्लीतील भेटीबाबतही खुलासा केला.
राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून विविध नेत्यांकडून वेगवेगळी नावे पुढे येत आहेत, त्यात आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेतल्याने या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. खडसे यांनी महाजन हेही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील दावेदार असल्याचा दावा केला, त्यांच्यामतदारसंघात त्यांना मुख्यमंत्री करण्याच्या आशयाचे फलकही लागले होते, असे सांगत त्यांनी महाजन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. एवढ्या लहान माणसासोबत मी संघर्ष करतोय, त्यांना मंत्री होईपर्यंत मी सर्वतोपरी मदत केली. माझ्या सभेशिवाय त्याच्या मतदारसंघातील निवडणूक प्रचाराची सांगता होत नव्हती, असा दावाही खडसेंनी केला.
पक्षातील काही स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे माझा प्रदेश रखडला आहे. वरिष्ठ नेत्यांनी मला स्पष्ट सांगितले की, तुम्हाला पक्षात घेतले तर स्थानिक लोक काम करणार नाहीत. ‘खड़सेना पक्षात घेतले तर आम्ही लोकसभेची जागा पाडून टाकू.” अशी ब्लॅकमेलिंगही करण्यात आली. त्यामुळे लोकसभेत आमचे काम करा, पुढे पाहू, असे वरिष्ठानी सांगितले होते. मग माझ्या पक्षप्रवेशाला नेमका विरोध का होतोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Amit Shah)
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या भेटीवरही खड़सेनी स्पष्टीकरण दिले. ती केवळ औपचारिक भेट होती. त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, मी त्यांना आणि नितीन गडकरी यांनाही वाढदिवसाचे निमंत्रण दिले असून गडकरी यांनी उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे, असे खडसे म्हणाले.
खडसेंच्या रखडलेल्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की,”खडसेंचा प्रदेश माझ्यामुळे कसा काय रखडला ? वरिष्ठ पातळीवरील घडामोडी मी कसं काय थांबवणार? त्यांची डायरेक्ट दिल्लीला हॉटलाईन आहे. मी तर छोटा माणूस आहे, माझी मुंबईपर्यंत देखील हॉटलाईन नाही आहे. मी आपल्या जळगाव जिल्ह्यापुरता बरा आहे. निश्चितच त्यांना जर वरून ग्रीन सिग्नल मिळाला आहे तर ठीक आहे.”






