एनसीपी शरद पवार यांनी बीएमसीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे (फोटो - सोशल मीडिया)
महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक अजित रावराणे आहे. त्यांनी आता महायुतीला पाठिंबा देत असल्याचे स्पष्टपणे जाहीर केले आहे. नगरसेवक अजित रावराणे यांनी सत्ताधारी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे बंधूंना मोठा झटका बसला आहे. यामुळे महापालिकेत आता दोन्ही राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभ्या असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
हे देखील वाचा : ‘मी देवेंद्र फडणवीस यांचा लाडका मंत्री, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ शकतो’; नितेश राणे यांचं विधान
मीडिया रिपोर्टनुसार, मालाडमधील प्रभाग क्रमांक ४३ मधून अजित रावराणे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरसेवक आहेत. आणि ते एकमेव शरद पवार गटाचे मुंबईमधील नगरसेवक आहेत. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांची विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर रावराणे यांनी महायुतीच्या गोटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार गटाचा हा सत्ताधाऱ्यांना पूर्णपणे पाठिंबा असल्याचे दिसून आले आहे.
महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर अजित रावराणे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला आहे. ते म्हणाले की, गेल्या काही काळापासून प्रभागातील विकासकामांसाठी आवश्यक असणारा निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. सत्ताधाऱ्यांसोबत गेल्याशिवाय विकास शक्य नाही. तसेच प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी महायुती सरकारकडून सहकार्य मिळवण्याचे आश्वासन मिळाले आहे, त्यामुळे मी पाठींबा जाहीर केला आहे, असे स्पष्ट मत अजित रावराणे यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : Eknath Shinde News: एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत; काय आहे कारण?
राज्यामध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेली महापालिका ही मुंबई महापालिका राहिली आहे. या पालिकेमध्ये मागील 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. मात्र भाजपला शिवसेनेची सत्ता मोडण्यास यश आले आहे. यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीला जनतेची भक्कम साथ असल्याचे दिसून आले आहे. महायुतीमध्ये अजित पवार गट हा आधीपासून भाजप व शिंदेसेनेचा पाठिशी होती. यानंतर आता शरद पवार गटातील एकमेव नगरसेवकाने देखील महायुतीला साथ दिली आहे. त्यापूर्वी संपूर्ण राष्ट्रवादी ही महायुतीमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आगामी महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आणि छोट्या गटांच्या नगरसेवकांना वळवण्यात शिंदे गटाला यश येत आहे.






