फोटो सौजन्य - Social Media
अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात नवा कलाटणीबिंदू निर्माण करणारी घटना शनिवारी घडली. महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांच्या कर्जत येथील निवासस्थानी अनपेक्षित सदिच्छा भेट दिली. राजेंद्र फाळके यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या या निर्णयानंतर प्रा. शिंदे यांच्या अचानक भेटीने जिल्ह्यातील राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे.\
गेल्या काही आठवड्यांत आमदार रोहित पवार यांचे अनेक सहकारी दूर गेले आहेत. नुकतीच दत्तात्रेय वारे यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सोडचिठ्ठी दिल्याने आधीच तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत फाळके आणि शिंदे यांची झालेली ही भेट राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली हे स्पष्ट नसले तरी राजकारणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर अनौपचारिक संवाद झाल्याचे सूत्रांकडून समजते. भेटीदरम्यान कोरेगावचे माजी सरपंच शिवाजी आप्पा फाळके तसेच फाळके परिवारातील सदस्य उपस्थित होते. प्रा. शिंदे यांनी फाळके यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला.
या सदिच्छा भेटीमुळे केवळ कर्जत-जामखेड मतदारसंघातच नव्हे, तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कार्यकर्त्यांमध्ये विविध तर्क-वितर्क सुरू असून, या भेटीचा भविष्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही नेते विरोधी राजकीय पथकातील असले तरी त्यांच्यात कधीही वैयक्तिक वाद किंवा आरोप-प्रत्यारोप झाले नाहीत. त्यामुळेच या भेटीला राजकीय पातळीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कर्जत-जामखेड परिसरात सध्या या घटनेचीच सर्वत्र चर्चा असून, या संवादातून भविष्यातील राजकीय हालचालींना दिशा मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.