संपूर्ण लाकडी मूर्ती असणारे पुण्यातील धर्मवीर संभाजी गणपती मंडळ आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Ganeshotsav 2025 : प्रिती माने : पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा ऐतिहासिक वासरा लाभलेला आहे. गणेशोत्सावाशी प्रत्येक कार्यकर्त्याचे भावनिक नाते जोडलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाज एकत्रित राहण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या या उत्सवामध्ये मंडळांची स्थापन करण्यात आली. यामधीलच एक म्हणजे रविवार पेठेतील धर्मवीर संभाजी तरुण मंडळ. विशेष बाब म्हणजे यांची बाप्पाची मूर्ती जुन्या लाकडी पद्धतीची आहे.
पुण्यातील मोजक्याच मंडळांमध्ये आजही लाकडी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यापैकी एक मूर्ती ही रविवार पेठेमध्ये आहे. हनुमानाच्या रुपामध्ये हा गणराय असून अतिशय देखणे असे तिचे स्वरुप आहे. विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण मूर्ती एकाच लाकडामध्ये कोरण्यात आली आहे. ही मूर्ती प्रभाकर भोसले यांनी साकारली आहे. मूर्तीकाराने अखंड एका लाकडामध्ये आपली कला साकारली आहे. गणरायाची सोंड वैशिष्ट्यपूर्ण आहे. सोंडेसाठी शमीचे लाकूड वापरण्यात आले आहे. मात्र हे लाकूड शोधण्यासाठी तब्बल दोन वर्षांचा कालावधी गेला. यावरुन मूर्तीकाराची कामाप्रती सिद्धता दिसून येते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गणपतीचे स्वरुप हे रामभक्त श्री हनुमानाचे आहे. शक्तीशाली हनुमानाची प्रतिमा या मूर्तीमधून प्रकट होते. बळकट बाहू आणि कणखर बांधा हा मूर्तीमधील वैशिष्ट्य अधोरेखित करतो.
हनुमान हे श्री रामाचे परम भक्त म्हणून ओळखले जातात. हनुमानाने आपली भक्ती सिद्ध करताना छाती फाडून दाखवली. यावेळी हनुमानाच्या छातीमध्ये प्रभू राम आणि सीता दिसली होती अशी आख्यायिक लोकप्रिय आहे. याचीच प्रचिती या गणरायाच्या मूर्तीमध्ये देखील दिसून येते. मधोमध छाती फाडलेली असून यामध्ये राम-सीतेची प्रतिमा आहे. गणराय खडकावर उभा राहिलेला असून मागे झाडांच्या फांद्या देखील आहेत. त्याचबरोबर गणरायाच्या पायाजवळ भलामोठा नाग देखील कोरण्यात आला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रविवार पेठेतील या गणरायाच्या लाकडी मूर्तीला मुकूट नाही. गणरायाचे कुरळे केस मोकळे सोडलेले आहेत. जवळपास 100 वर्षांपूर्वी ही मूर्ती साकारण्यात आलेली आहे. हनुमानच्या स्वरुपासोबतच छत्रपती संभाजी महाराजांच्या रुपामध्ये देखील लाकडी मूर्ती साकारण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे सिंहाचा जबडा फाडताना साकारण्यात आला आहेत. दोन्ही मूर्ती एकाच मूर्तीकाराने एकाच कालावधीमध्ये घडवल्या असून त्यांना अतिशय जीवंत स्वरुप देण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची ही मूर्ती गुरुवार पेठेतील उल्हास मित्र मंडळाकडे आहे. यामध्ये जबडा फाडताना सिंह आणि आक्रमक छत्रपती संभाजी महाराज लाकडामध्ये कोरण्यात आले आहेत. त्याचबरोबर नाग आणि हरिण देखील आहेत. संपूर्ण लाकडामध्ये गणरायाच्या या विविध स्वरुपातील मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. पुण्यातील मध्यवर्ती भागांमध्ये गणेशोत्सावाला वर्षानूवर्षांची परंपरा आहे. त्यातील या संपूर्ण लाकडी श्रींच्या मूर्ती या आजही आपले वैशिष्ट्य टिकवून आहेत.