राज ठाकरे यांनी बीएमसी निवडणुकीत आपला पराभव स्वीकारला आहे', भाजप नेते शेलार यांचा दावा
मुंबई महापालिकेसाठी नऊ वर्षांनी मतदान होत असून पालिका प्रशासन व निवडणूक यंत्रणेकडून मतदानपूर्व तयारी पूर्णत्वास आली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण २२७ निवडणूक प्रभागांकरिता निवडणूक होत आहे. याचदरम्यान महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी दावा केला की मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव मान्य केला आहे. त्यांनी राज्य निवडणूक आयोगावर जबाबदारी टाळण्याचा आरोप केला.
राज ठाकरे आणि शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सुरु असलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट्स (पीएडीयू) च्या वापरावर आक्षेप घेतला. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) तांत्रिक बिघाड झाल्यास मतमोजणी सुलभ करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत पहिल्यांदाच पीएडीयूचा वापर केला जात आहे. बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले होते की हे बॅकअप युनिट्स म्हणून काम करतील. इतर ईव्हीएम युनिट्सप्रमाणे, हे युनिट्स रिटर्निंग अधिकाऱ्यांकडेच राहतील. त्यांचा वापर फक्त आपत्कालीन परिस्थितीतच केला जाईल.
एका प्रश्नाच्या उत्तरात शेलार म्हणाले की, राज ठाकरे बीएमसी निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या कामगिरीची जबाबदारी झटकण्यासाठी निराधार सबबी सांगत आहेत आणि एसईसीला दोष देत आहेत. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “मी मतदारांना पुढे येऊन प्रगती आणि विकासासाठी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बीएमसी चालवण्याच्या पद्धतीला धडा शिकवण्याची ही संधी आहे.”
ठाकरे कुटुंबाच्या चुलतभावांनी मराठी ओळख हा निवडणुकीचा मुद्दा बनवल्याबद्दल विचारले असता, शेलार यांनी ते फेटाळून लावत म्हटले की, निवडणूक प्रचारात हा मुद्दा नाही. ते म्हणाले की ही निवडणूक मुंबईच्या विकास आणि प्रगतीशील धोरणांबद्दल आहे; शहराचा विकास कोण आणि कसा करेल हे मुद्दे आहेत.
दरम्यान , आज होत असलेल्या महापालिका निवडणुकांसाठी ठाणे जिल्ह्यात भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही ठाकरे बंधू यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी या सहा महापालिकांमध्ये मतदार राजा कुणाला कौल देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रचारात सुरुवातीच्या काळात काहीसे मागे पडलेल्या ठाकरे बंधूनी शिवाजी पार्क येथील सभेनंतर राजकीय वातावरण फिरवण्यास सुरुवात केली, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे शिवाजी पार्कवरील भाषण तसेच, युवा सेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे यांचे मुंबईवरील भाषण राजकीय वर्तुळात खळबळ उडवून गेले.
त्यानंतरच दुसऱ्या दिवशी ठाकरे बंधूंनी ठाण्यात गडकरी रंगायतनसमोर जाहीर सभा घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केले. ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे नवी मुंबईतील नेते व वनमंत्री गणेश नाईक हे ज्याप्रकारे शिंदे यांना आव्हान देत आहेत त्याचा संदर्भ देत ठाणे पालिकेतील भ्रष्टाचारावरही तोंडसुख घेतले. ठाकरे बंधूंच्या या जोरदार एल्गारमुळे मराठी मतदार जर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाविरोधात एकवटला तर त्याचे पडसाद ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.






