छत्रपती संभाजीनगरमधील पाण्याच्या श्रेयावरुन शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटामध्ये संघर्ष सुरु (फोटो - सोशल मीडिया)
छत्रपती संभाजीनगर : राज्यामधील राजकारण्यांमध्ये रोज नवीन मुद्द्यांवरुन जोरदार राजकारण तापले आहे. शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये नेत्यांमध्ये देखील जोरदार टीका टिप्पणी केली जात आहे. खासदार संदिपान भुमरे यांनी जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली आहे. भुमरे विरुद्ध खैरे असा राजकीय संघर्ष दिसून येत आहे. खासदार संदिपान भुमरे यांनी यांनी ठाकरे गटाला निशाण्यावर धरले आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील पाणी प्रश्नावरुन राजकारण तापले आहे. पाण्याच्या सोयीसाठी ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन केले जात आहे. ठाकरे गटाचे युवानेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे देखील यावरुन आंदोलन करत आहेत. यावरुन शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर शहराला लवकरच पाणीपुरवठा सुरू होणार आहे. याचं श्रेय घेण्यासाठी आदित्य ठाकरे आणि त्यांची शिवसेना आंदोलन करत आहे. चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे होते. त्यांनी लक्ष घातले नाही, त्यामुळे पाणीपुरवठ्याची योजना पूर्ण झाली नाही. उद्धव ठाकरे यांच्या काळात योजना पूर्ण झाली नाही म्हणून लोकांचे हाल झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरठवा करणाऱ्या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला, अशी टीका संदीपान भूमरे यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरला पाणी मिळण्यासाठी अनेक प्रयत्न केले असल्याचे सांगितले. भूमरे म्हणाले की, “पूर्वीचा खासदार 20 वर्षात गावागावात गेला नाही. कोण खैरे? खैरे यांना आता कोणीही विचारत नाही. चंद्रकांत खैरे हा ढोंगी माणूस आहे. खैरे यांनी सगळ्या योजनेचा बट्ट्याबोळ केला. खैरे यांच्यामुळेच शहराला पाणी मिळाले नाही. खैरे यांनी आता त्यांची नातवंडं सांभाळावीत,” असा टोला देखील संदीपान भूमरे यांनी लगावला आहे. यामुळे संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा भूमरे विरुद्ध खैरे असा संघर्ष दिसून आला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संदीपान भूमरे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेचे विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “अंबादास दानवे यांना आम्ही दाखवून दिले. त्यांचा जिल्ह्यात एकही आमदार निवडून आला नाही. अंबादास दानवे हे कागदोपत्री नेते आहेत. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी जिल्ह्याची वाट लावली. आता या जिल्ह्यात ठाकरे यांच्या पक्षात खैरे आणि दानवे हे दोघेच राहणार आहेत आणि वरदेखील ते बाप-लोक दोघेच राहणार आहेत, अशी मिश्किल टिप्पणीदेखील भुमरे यांनी केली. त्यांनी जिल्ह्यात चांगलं काम केलं असतं तर लोकांनी निवडून दिलं नसतं का?” असा सवाल खासदार संदीपान भूमरे यांनी उपस्थित केला आहे.