Kalyan Dombivli Politics: ठाकरे गटाच्या नेत्याच्या कार्यालयाचे शिंदेंच्या नगरसेवकाच्या हस्ते उद्घाटन,नेमकं काय आहे प्रकरण?
Kalyan Dombivli Politics: राज्यात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय शत्रुत्व आणि वाद हे काही लपून राहिलेले नाही. दोन्ही गटांमध्ये सातत्याने शाब्दिक चकमकी होत राहतात. मात्र, कल्याण-डोंबिवलीत मात्र काहीसा वेगळाच प्रकार समोर आला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही कट्टर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमध्ये एक वेगळेच मनोमिलन पाहायला मिळाले आहे. कल्याण पूर्व द्वारली येथे ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबायत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन चक्क शिंदे शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या अनोख्या उद्घाटनामुळे सध्या स्थानिक राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Nashik Crime: नाशिकमध्ये जमीन वादातून थरार! दोन महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडल्याचा आरोप
या कार्यक्रमातील आपल्या उपस्थितीबद्दल शिंदे शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांना विचारण्यात आले असता त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आल्याचे सांगितले. कुणाल पाटील म्हणाले की, “मला या कार्यक्रमाचे अधिकृत आमंत्रण देण्यात आले होते, म्हणूनच मी येथे आलो. निलेश खंबायत आणि माझे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत.”
तर “या कार्यक्रमात कोणतेही पक्षीय भेद किंवा राजकारण नाही. आमचे गटनेते सध्या पुण्याला आहेत. दुसरीकडे, कुणाल पाटील यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध आहेत. एक मोठा भाऊ या नात्याने मी त्यांना या उद्घाटनासाठी बोलावले होते, त्यामुळे यातून दुसरा कोणताही राजकीय अर्थ काढू नये,” असे ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबायत यांनी स्पष्ट केले.
निलेश खंबायत यांनी सांगितले की, “आमच्या गटाचे नेते उमेश बोरगावकर हे सध्या पुण्यात आहेत. तसेच इतर नेते संध्याकाळी दुसऱ्या एका नगरसेवकाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जाणार असल्याने आज दुपारी माझ्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. माझे आणि कुणाल पाटील यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यामध्ये कोणतेही राजकारण नाही.”
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक कुणाल पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नागरिकांच्या हितासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबायत यांना निधी किंवा इतर कोणत्याही स्वरूपाची मदत लागल्यास मी आणि माझे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ती मदत केली जाईल. यात कोणतेही राजकारण नाही.”






