शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे जनआक्रोश आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Uddhav Thackeray Mumbai Live : मुंबई : केंद्रामध्ये राहुल गांधी तर राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये झालेली मतांची चोरी आणि राज्यातील बेताल वक्तव्य करणारे राजकीय नेत्यांची हकालपट्टी करावी अशा मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. याच मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन सुरु केले आहे. दादरमधील शिवाजी पार्क येथील जनआक्रोश आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे हे देखील सहभागी झाले आहेत.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसेना ठाकरे गटाकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले आहे. दादरमधील शिवाजी पार्क येथील आंदोलनामध्ये स्वतः उद्धव ठाकरे सहभागी झाले. यावेळी उपस्थितांनी या सरकारचे करायचे काय तर खाली डोकं वर पाय अशा घोषणा दिल्या. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही म्हणत आहात खाली डोकं वर पाय…पण ह्यांना डोकं तरी आहे का? हे बिनडोक्याचे आहेत. ह्यांना फक्त पाय आहेत सुरतेला आणि गुवाहटीला पळून जायला. डोकं कुठे आहे. त्यांच्याकडे फक्त खोके आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला,
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक शहरात या भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करणारा मर्द आपल्या शिवसेनेमध्ये आहे. आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांचा मोर्चा निवडणूक आयोगावर चालला आहे. आपण सुद्धा भ्रष्टाचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरलो आहे. ही जुलूमशाही सुरु आहे त्याच्या विरोधात आता जनतेला उतरावेच लागेल,” असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन! pic.twitter.com/geyb1VdNBW
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 11, 2025
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “लाज एका गोष्टीची वाटते की, आपण दरवेळी सांगतो की, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. नेहमी देशाला दिशा दाखवणारा गौरवशाली असणारा आपला महाराष्ट्र…या भ्रष्ट आघाडीने कितव्या क्रमांकावर नेऊन बसवला आहे. भ्रष्टाचाराची रांगा लावली तर महाराष्ट्र आता पहिल्या रांगेत आहे. पण विकास आणि नितिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवट्या रांगेत आहे. आता खरोखर लाज वाटते आम्हाला तुमची…आत्ताचे सरकार जनताभिमुख नाहीच आता ह्यांचं सरकार पैसे गिळणारं मुख असलेलं आहे,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे उद्धव ठाकरे यांनी आरोप करण्यात आलेल्या आमदारांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, “आपण फक्त बोलत नाही तर पुराव्यानिशी या सर्व आमदारांची आपण सभागृहाबाहेर यांची लख्तरे वाळत घातली होती. महाराष्ट्राचा एक मंत्री डान्सबार चालवतो आहे. कोणी पैशांची बॅग घेऊन बसलं आहे. एका मंत्र्याला तर त्याच्या आवडीचं खातं मिळालं ते म्हणजे रम्मीमंत्री. हे क्रीडा मंत्री नाही तर रम्मी मंत्री आहेत. शेतकऱ्यांची चेष्ठा आणि थट्टा करतात. भर सभागृहामध्ये तुम्ही रमी खेळता…शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यांच्याकडे पैसे नाहीत. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. देवेंद्र फडणवीस हे चौकशी करुन मंत्र्यांची हकालपट्टी करतील अशी अपेक्षा होती मात्र मुख्यमंत्री सांगतात की आम्ही त्यांना समज दिली आहे. रम्मी नाही तर आता तीन पत्ती खेळ…अशी समज दिली असेल,’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांंनी महायुती सरकार आणि कलंकित मंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.