‘बिहारने दिलेला जनादेश हा मोदींवरील विश्वासाचा शिक्का’, डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया
बिहार विधानसभा निवडणुकीत NDA आघाडी शानदार विजय मिळवताना दिसत आहे. भाजप आणि जेडीयू हे दोन प्रमुख पक्ष असलेल्या या आघाडीने 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. याच विजयावर संसदीय पक्षाचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’ला मिळालेल्या विजयानंतर शिवसेना (शिंदे गट) चे खासदार आणि संसदीय पक्षाचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या जनादेशाचे स्वागत करत मोदी नेतृत्वावरचा जनतेचा विश्वास पुन्हा अधोरेखित केला आहे.
डॉ. शिंदे यांनी सांगितले की , “बिहारला मिळालेला ऐतिहासिक जनादेश हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेल्या अखंड विश्वासाचा ठोस पुरावा आहे.” बिहारच्या जनतेने भ्रष्टाचार, अराजकता आणि जंगलराजाची आठवण करून देणाऱ्या शक्तींना ठाम नाकारत “जंगलराज नव्हे, मंगलराज” निवडल्याचे सांगितले.
काँग्रेस आणि तिच्या सहयोगी पक्षांच्या पराभवाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, जाती-धर्माच्या समीकरणांवर आधारित राजकारण आता जनतेला मान्य नाही. काँग्रेसची आमदारसंख्या एकेरीत जाणे हे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचा पराभव असल्याचे ते म्हणाले. “राहुल गांधी यांनी जातीय कार्ड आणि धार्मिक मुद्द्यांवर उभारलेले नरेटिव्ह पूर्णपणे फोल ठरले आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
बिहारमधील गरीब, मागासवर्ग, महिला, युवा, शेतकरी आणि कामगार यांनी एकमुखाने एनडीएला साथ दिल्याचे ते म्हणाले. नीतीश कुमार यांच्या सुशासन, स्वच्छ प्रतिमा आणि जनकेंद्रित कार्यशैलीवर बिहारने शिक्कामोर्तब केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. निवडणूक आयोगावरील टीकेचा उल्लेख करताना डॉ. शिंदे म्हणाले, “विरोधकांनी SIR सारख्या विषयावरून निवडणूक भरकटवण्याचा प्रयत्न केला आणि निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा डागाळण्याचा प्रयत्न केला. बिहारच्या जनतेने या बेजबाबदार राजकारणाचा कठोर निषेध केला आहे.”
या जनादेशातून प्रचंड प्रो-इन्कंबन्सीची लाट दिसून येत असल्याचे ते म्हणाले. भारतात बदल हवा आहे, पण तो अराजकतेतून स्थिरतेकडे, भ्रष्टाचारातून जवाबदेहीकडे असावा आणि तो बदल केवळ एनडीएच देऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी डॉ. शिंदे म्हणाले, “बिहारने एक स्पष्ट, ठाम आणि ऐतिहासिक संदेश दिला आहे. एनडीए हाच भविष्याचा मार्ग आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांकडे ना नेतृत्वाची क्षमता, ना शासनाची दृष्टि, ना जनतेचा विश्वास. बिहारच्या जनतेचे मी हार्दिक अभिनंदन करतो.






