स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची जोरदार तयारी
राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना संसदीय पक्षाचे नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभागनिहाय बैठका घेण्याचा धडाका लावला आहे. आज मुंबईत पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना मंत्री, आमदार, नेते आणि पदाधिकारी यांची सविस्तर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले की, स्थानिक पातळीवर कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जाईल.
बैठकीला शिवसेना नेते रामदास कदम, आनंदराव अडसूळ, डॉ. नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ नेत्या मीनाताई कांबळी, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मोरे आणि राम रेपाळे उपस्थित होते.
Chhagan Bhujbal News: जातगणनेची मागणी ओबीसी समाजाच्या न्यायासाठी; छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातील पंचायत समित्या, जिल्हा परिषद, नगर पालिका आणि महानगर पालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबईत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि कार्यकर्त्यांची विस्तृत बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणूक रणनीती, स्थानिक मुद्दे आणि महायुतीशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली.
खासदार डॉ. शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, तळागाळातील लोकांपर्यंत महायुती सरकारच्या योजना आणि विकासकामे पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. त्यांनी सांगितले की, मागील तीन दिवसांत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागांमध्येही अशाच प्रकारच्या आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीदरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबईतील मराठी माणसाच्या प्रश्नावरून जोरदार टीका केली. त्यांनी विचारले, “मराठी माणूस मुंबईबाहेर गेला तेव्हा हे लोक कुठे होते?” मागील २० वर्षांत मराठी माणूस कल्याण, डोंबिवली, कर्जत, कसारा अशा परिसरांपर्यंत स्थलांतरित झाला, पण त्यावेळी मराठी माणसाची आठवण कुणाला झाली नाही, असा टोला त्यांनी उबाठाला लगावला.
त्यांनी सांगितले की, मागील अडीच वर्षांत बी.डी.डी. चाळ, रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्प आणि वांद्रे येथील संक्रमण शिबिरात राहणाऱ्या मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्याचे कार्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. “मुंबईबाहेर फेकल्या गेलेल्या मराठी माणसांना पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आज महायुती सरकार करत आहे,” असे ते म्हणाले.
खासदार शिंदे यांनी पुढे म्हटले की, मतदार खूप हुशार आहे. “मराठीच्या मुद्द्यावर फक्त स्वतःचे राजकीय अस्तित्व आणि कुटुंब वाचवण्यासाठी एकत्र येणाऱ्या लोकांचा मराठी माणसांवर काही परिणाम होणार नाही,” अशी टीका त्यांनी केली.