उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! महिला उपनेत्या हजारो कार्यकर्त्यांसह करणार शिंदेसेनेत प्रवेश
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सलग राजकीय धक्के बसत असतानाच आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या धुळे जिल्ह्यातून हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाल्या असून, शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
सहा खासदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर आता शुभांगी पाटील यांच्या पक्षांतरामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी पाटील या धुळे जिल्ह्यातील आपल्या समर्थक आणि शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल होत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शुभांगी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरुवातीला त्यांनी या चर्चांचे खंडन केले होते. मात्र आता त्यांनी पक्षांतराचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाबाबत बोलताना त्या म्हणाल्या,”उद्धव ठाकरे साहेबांबद्दल माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही. मात्र हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.”
अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार शिंदे गटात दाखल झाले होते. त्यानंतर सचिन अहिर यांनीही पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला. या घडामोडींनंतर राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, विकासनिधी आणि स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे कारण काही पक्षांतर केलेल्या नेत्यांनी यापूर्वी दिले होते. शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटातील आणखी काही नेते आगामी काळात शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






