प्रशांत किशोर यांना तेजप्रताप यांचा पाठिंबा; जनसुराज पक्षामध्ये सामील होण्याचे राजदला आवाहन (फोटो - सोशल मीडिया)
पाटणा : बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले जनसुराज पक्षाचे शिल्पकार प्रशांत किशोर यांना जनशक्ती जनता दलाचा पाठिंबा मिळाला आहे. जेजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तेज प्रताप यादव यांनी या पोटनिवडणुकीत पीकेंच्या पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी वडील लालू प्रसाद यादव आणि धाकटे बंधू तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाकडून बांकीपूरमधून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवार रेखा गुप्ता यांनाही पीकेंच्या पक्षात सामील होण्याचे आवाहन केले आहे.
जेजेडीच्या उमेदवार वीणा मानवी यांची उमेदवारी फेटाळण्यात आली होती, त्यानंतर तेजप्रताप यांच्या पक्षाने निवडणुकीतून माघार घेतली होती. बिहारचे माजी मंत्री आणि जेजेडी प्रमुख तेज प्रताप यादव यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले, बांकीपूरमध्ये योग्य लोक निवडून यावेत अशी आमची इच्छा आहे. लोकांना न्याय मिळाला पाहिजे. राजदचाही बांकीपूरमध्ये उमेदवार उभा आहे. राजदच्या रेखा गुप्ता यांनीही प्रशांत किशोर यांना पाठिंबा द्यावा, अशी आमची इच्छा आहे.
बांकीपूर जागेवरील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप प्रशांत किशोर यांना मोठा धक्का देत आहे. गेल्या काही दिवसांत जनसुराज पक्षाचे अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. यामध्ये के. सी. सिन्हा, चेतना झांब आणि इतर अनेकांचा समावेश आहे. भाजपकडून बसत असलेल्या या धक्क्यांमध्ये तेज प्रताप यांनी पीके यांना नैतिक पाठिंबा दिला आहे.
30 जुलै रोजी मतदान, तिरंगी लढतीची शक्यता
पाटणा शहरातील बांकीपूर जागेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० जुलै रोजी मतदान होणार आहे. मतमोजणीची तारीख ३ ऑगस्ट आहे. या जागेवर तिरंगी लढत अपेक्षित आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या जागेवरून जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी स्वतः निवडणूक लढवली आहे.
रेखा गुप्ता निवडणुकीच्या रिंगणात
भाजपने तरुण उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय, महाआघाडीकडून आरजेडीच्या रेखा गुप्ता निवडणूक लढवत आहेत, ज्यांनी यापूर्वीही याच जागेवरून निवडणूक लढवली आहे.






