सहकारामध्ये ग्रामीण भागाच्या विकासात पुणे जिल्हा बँकेचे मोठे योगदान : सुनेत्रा पवार
पुणे : सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास कसा घडवायचा, याचे उत्तम उदाहरण पुणे जिल्हा मध्यमवर्ती सहकारी बँक असून, या बँकेने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक कुटुंबे स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उभी करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने एआय तंत्रज्ञानावर आधारित अजितदादा कृषी समृद्ध योजनेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण आधुनिक प्रयोग करून शेती उत्पादनात वाढ करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बोलत होत्या. यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शंकर मांडेकर, सत्यशील शेरकर,दिलीप मोहिते पाटील, वीरधवल जगदाळे, हर्षवर्धन पाटील, अशोक पवार, पृथ्वीराज जाचक, विश्वासराव देवकाते यांच्यासह बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे आदींसह इतर मान्यवर व बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे बँकेच्या अजितदादा समृद्ध शेतकरी कर्ज योजनेचा शुभारंभ हा केवळ योजनेचा शुभारंभ नसून, अजितदादांच्या विचारांना खरी आदरांजली आहे. या बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६१९०० पात्र शेतकऱ्यांना ५२३ कोटी २२ लाख रुपयांची कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. बळीराजा हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, या बळीराजाचा कायम सन्मान जपण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अजितदादांसारखा नेता पुन्हा होणे नाही, असे सांगत त्यांची आठवण काढताना ते भावनाविवश झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा बँकेने केलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात देशातील सहकारात पुणे जिल्हा बँक ही आदर्शवत बँक असल्याचे सांगून अजितदादांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य शेतकऱ्याला सकाळी कर्ज प्रकरणासाठी अर्ज दिल्यानंतर संध्याकाळी कर्ज मंजुरी देणारी देशातील एकमेव बँक असल्याचे सांगून दिवंगत अजितदादांसह आमच्या राजकीय जीवनामध्ये या बँकेचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. दिलीप वळसे पाटील यांनी देखील आपल्या भाषणात अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रास्ताविकात प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी बँकेच्या प्रगतीमध्ये अजितदादांचा सर्वात मोठा वाटा असल्याचे सांगून १९९१ मध्ये अजितदादा या बँकेचे संचालक झाले, त्यावेळी ३१४ कोटींच्या ठेवी बँकेत होत्या. त्यानंतर आत्तापर्यंत बँकेच्या ठेवी १७१८९ कोटी १३ लाख रुपयांच्या ठेवी झाल्या असून, बँकेची उलाढाल ३०६६७ कोटी ७४ लाख रुपये झाली आहे. देशातील पहिल्या ५ सहकारी बँकांमध्ये पुणे जिल्हा बँक आहे, देशातील अर्थ तज्ञांनी पुणे जिल्हा बँक केस स्टडी म्हणून इतर सहकारी बँकांनी अभ्यास करायला हवा, असे मे व्यक्त केले आहे.
अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे त्यांच्या नेतृत्वाखाली तसेच दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व इतर संचालकांच्या सहकार्याने बँक शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर बँकेच्या इतर योजनांची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.






