Krishna karkhana Election:'कृष्णा' कारखान्याच्या निवडणुकीचे राजकारण तापले; नव्या चेहऱ्यांची एन्ट्री; काय आहेत आगामी राजकीय समीकरणे?
Krishna Sahakari Sakhar Karkhana Election 2026 : साखर पश्चिम महाराष्ट्रातील बहुचर्चित यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या आगामी निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची असली, तरी कार्यक्षेत्रात राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. सत्ताधारी सहकार पॅनेल आणि संस्थापक पॅनेल यांच्यात थेट सामना होणार! की रयत पॅनेलच्या संभाव्य एंट्रीमुळे लढत तिरंगी रंग घेणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘कामगिरी विरुद्ध विश्वास’ आणि ‘सत्ता विरुद्ध परंपरा’ या चौकटीत रंगणारी ही निवडणूक पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रस्थानी येऊ लागली आहे. रेठरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर होण्याआधीच वातावरण तापले आहे.
यंदाच्या निवडणुकीत काही जागावर नवीन चेहरे संधी मिळवू शकतात, अशी चिन्हे आहेत. दोन्ही गटांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून, स्थानिक प्रभाव, सामाजिक समीकरण आणि मतदारसंघनिहाय गणिते यांचा सखोल अभ्यास केला जात आहे. यामुळे काही ठिकाणी पारंपरिक समीकरणांना धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणूक जाहीर होण्याआधीच कार्यक्षेत्रातील राजकीय तापमान उच्चांक गाठू लागले आहे. पुढील काही आठवड्यांत आघाड्या, उमेदवार आणि प्रचाराचे मुद्दे अधिक स्पष्ट होतील, निवडणुकीच्या रणसंग्रामात होणारी ही लढत ‘दुरंगी की तिरंगी ! नेमकी कोणत्या स्वरूपात रंगते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जून महिन्यात निवडणूक कार्यक्रम अपेक्षित असला, तरी गेल्या काही आठवड्यांपासूनच विविध गटांनी आपापल्या पातळीवर ‘पूर्वतयारी मोहीम सुरू केली आहे. सामाजिक कार्यक्रमांतील वाढलेली उपस्थिती, बैठका, गाठीभेटी आणि संपर्क दौरे यांमधून आप्रत्यक्ष प्रचाराचा जोर वाढताना दिसतो. ६५ वर्षांची परंपरा आणि तब्बल ४७ हजार सभासद असलेला हा कारखाना सातारा आणि सागली जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये विस्तारलेला असल्याने या निवडणुकीकडे केवळ स्थानिक नव्हे, तर प्रादेशिक पातळीवरही लक्ष लागले आहे.
या निवडणुकीतील सर्वात महत्वाचा आणि अनिश्चित घटक म्हणजे रयत पॅनेल, माजी चेअरमन इंद्रजीत मोहिते यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते स्वतंत्रपणे मैदानात उतरणार का? की कोणत्या एका गटाला पाठिबा देणार? किंवा तटस्थ भूमिका घेणार? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. मात्र, त्यांच्या निर्णयावर संपूर्ण निवडणुकीचे चित्र बदलू शकते, हे निश्चित. जर रयत पॅनेल स्वतंत्रपणे उत्तरले, तर निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता अधिक आहे. अन्यथा पारंपरिक दुरंगी लढतच रंगू शकते.






