स्वारगेट छेडछाड प्रकरणाविरोधात ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी तीव्र आंदोलन केले आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुण्यामध्ये स्वारगेट बसस्थानकामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला. या घटनेतील आरोपीचा फोटो समोर आला असून दत्तात्रय रामदास गाडे असे या नराधमाचे नाव आहे. या घटनेचे राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यामध्ये ठाकरे गटाने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट आगाराची तोडफोड केली असून गंभीर आरोप केले आहेत.
गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला. तरुणीला फसवून नराधमाने तिला बंद असलेल्या बसमध्ये चढवले. यामुळे पुण्यामध्ये आता तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असून देखील असे प्रकार घडत असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. या घटनेच्या विरोधात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच स्वारगेटमध्ये जाऊन बसेसची तोडफोड करुन निषेध देखील दर्शवला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वसंत मोरे यांनी स्वारगेट आगारामध्ये तीव्र आंदोलन केले आहे. यावेळी वसंत मोरे म्हणाले की, “या लोकांनी चार बसेसचं लॉजिंग केलं आहे. याचा अर्थ असा होतो की याच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत इथे रोज बलात्कार होतात. मीडियाने सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या तर कळेल बसेस मध्ये कंडोम पडले आहेत. आगाराच्या मागच्या बाजूला या बसेस ठेवल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी या लोकांचा हात आहे.” असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. तसेच आगारातील कर्मचाऱ्यांवर, सुरक्षा रक्षकांवर वसंत मोरेंनी गंभीर आरोप केले आहेत.
ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी आगार प्रमुखांच्या निलंबनाची देखील मागणी केली. ते म्हणाले की, आगार प्रमुखांचं निलंबन केलं पाहिजे आणि सुरक्षा रक्षकांवर कारवाई झाली पाहिजे. ३७६ क्रमांकाच्या कलमांखाली यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. बलात्कार होत असताना हे सगळे बघ्याच्या भूमिकेत होते का? आम्ही सुरक्षा केबीनची तोडफोड केली आहे. त्या समोर असलेल्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला आहे. हा विषय संवेदनशील आहे. आगाराच्या मागच्या बाजूला उभ्या असलेल्या बसेस पाहिल्या तर कळेल की इथे रोज बलात्कार होत आहेत. कुणाला तरी इथे आणलं जातं आहे आणि बलात्कार केला जातो आहे, अशी आक्रमक भूमिका वसंत मोरे यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “ज्या आरोपीने बलात्कार केला तो पाच दिवसांपासून स्वच्छतागृहाजवळ झोपत होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला हटकलं का नाही? सुरक्षा कर्मचारी या लोकांना मॅनेज होतात का? पोलीस यंत्रणा हाकेच्या अंतरावर असली तरीही ते पोलीस स्टेशन आगाराच्या बाहेर आहे. मात्र या ठिकाणी २० सुरक्षा कर्मचारी आहेत ते काय झोपा काढतात का? ते अशा प्रकारे काम करत असतील तर त्यांचं निलंबन केलं पाहिजे. शिवशाही या नावाखाली या लोकांनी थेट लॉजिंग तयार केलं आहे. त्या ठिकाणी साड्या पडल्या आहेत, कंडोम, कंडोमची पाकिटं पडली आहेत, असा धक्कादायक दावा वसंत मोरे यांनी केला आहे.