'तो दिवस आमच्या कुटुंबासाठी अत्यंत दुखद आणि उद्ध्वस्त करणारा होता': पंकजा मुंडे
Pankaja Munde News: तीन जून 2014 हा दिवस पंकजा मुंडे यांच्या कुटुंबासाठी अत्यंत दुखद आणि उद्ध्वस्त करणारा होता, अशी भावना मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. तसेच, मुलगी म्हणून त्यांचे कर्तव्य जाणीवपूर्वक पार पाडण्यासाठी आज साधारण कार्यक्रम आयोजित केला असल्याचेही त्यांनी सांगितले. दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज परळीत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पण पावसामुळे हा कार्यक्रम लवकर संपवावा लागला, पण मुंडे साहेबांच्या संकल्पनेतून आम्ही काम करत आहोत. आतापर्यंत अनेक कामे झाली आहेत.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. या निमित्ताने गोपीनाथगडावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ११ वर्षांनंतर पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनंजय मुंडे उपस्थित राहणार की नाहीत, असा प्रश्न विचारल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता आमचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे त्या पक्षातील सर्व नेत्यांना आम्ही निमंत्रण दिले आहे. तसेच, धनंजय मुंडे यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमात कीर्तनाचाही समावेश आहे आणि धनंजय मुंडे हे माझे भाऊ असल्यामुळे ते नक्कीच या कीर्तनाला उपस्थित राहतील.”११ वर्षांनंतर एकाच मंचावर दोन्ही मुंडे बंधू-भगिनी येणार असल्यामुळे हा कार्यक्रम राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
रामटेक बंगल्याबाबतही पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. “हा बंगला मला राहण्यासाठी मिळाला आहे. खरं तर, २०१४ मध्येच मी तो मागितला होता, पण तो वरिष्ठ मंत्र्यांचा बंगला असल्याने मला मिळाला नव्हता. आता तो मला मिळाल्याने मला मोठं पारितोषिक मिळाल्याचा आनंद वाटतो, मुंडे साहेबांच्या पश्चात मला हा बंगला मिळणे, ही गोष्ट ऐतिहासिक आहे. देशात असं एखादंच उदाहरण असेल. हा बंगला माझ्यासाठी केवळ वास्तू नाही, तर एका विचारांचा आणि जबाबदारीचा प्रतीक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.