Majhi Ladki Bahin Yojna: राज्य सरकारकडून ‘लाडकी बहीण’यासारख्या सामाजिक योजनांसाठी निधी टंचाईचं कारण देत अडथळे आणले जात असताना, दुसरीकडे मंत्र्यांच्या परदेशवारीवर कोट्यवधींचा खर्च केला जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. कुंभार यांनी २०२५ मध्ये मंत्र्यांनी केलेल्या किंवा नियोजित परदेशभ्रमंतीची यादी सादर करत सरकारवर सडकून टीका केली. “जनतेच्या पैशातून युरोपच्या सहली, फाईव्ह स्टार हॉटेल्स, आलिशान फ्लाईट्स आणि साईटसीइंग सुरू आहे. लोककल्याणासाठी पैसा नाही, पण मंत्र्यांच्या मौजमजेसाठी मात्र कोणतीही अडचण नाही. ही लोकशाहीची थट्टा आहे,” अशी टीका कुंभार यांनी केली आहे.
या परदेश दौर्यांवर लाखो रुपयांचा खर्च झाल्याचं सांगत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “हा सर्व खर्च जनतेच्या कररूपी पैशातून केला जात आहे. मंत्री हॉटेल, आलिशान फ्लाइट्स, साईटसीइंग, सगळं काही VIP दर्जात अनुभवत आहेत,” पण सध्याच्या आर्थिक परिस्थितीत जनतेसाठी महत्त्वाच्या योजनांना निधी दिला जात नसताना मंत्र्यांच्या परदेशवारीवर इतका खर्च करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्य सरकारकडून मंत्र्यांच्या परदेशवारींना ‘शासकीय दौरे’ म्हणून सादर केले जात असले तरी या सहलींचे खरे उद्देश, त्याचा समाजावर होणारा लाभ आणि जनतेपर्यंत त्याचे पडसाद पोहोचत आहेत का, असा गंभीर प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे. कुंभार म्हणाले, ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी निधी नाही, पण मंत्र्यांच्या या ‘चैन’साठी कोट्यवधी रुपये सहज मंजूर होतात. मग हा फरक का?”
मधुचंद्रासाठी शिलाँगला जाऊन बेपत्ता झालेल्या जोडप्यापैकी एकाचं सापडला मृतदेह, दुसऱ्याचा शोध सुरु
गेल्या काही महिन्यांपासून ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी निधी न मिळाल्याने हजारो महिलांना वेळेवर लाभ मिळत नाही. पण या योजनेसाठी राज्य सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही आणि त्यामुळे इतर खात्यांतून पैसे वळवावे लागत आहेत, असे राज्य सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र, मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांसाठी मात्र कोट्यवधींचा खर्च सहज मंजूर होतो.
जयकुमार रावल यांचा नुकताच फ्रान्स, नेदरलँड आणि स्वित्झर्लंड दौरा चर्चेचा विषय ठरला आहे, तर त्याचवेळी आणखी काही मंत्र्यांच्या ‘व्हीआयपी टूर’ची यादीही समोर आली आहे. कुंभार यांनी सरकारवर प्रश्न उभा करत म्हणाले की, “जनतेच्या पैशाचा वापर खऱ्या जनकल्याणासाठी व्हायला हवा, परंतु आताच्या काळात ही स्थिती चिंताजनक आहे.”
जयकुमार रावल – युरोप
उदय सामंत – यूएई
इंद्रनील नाईक – जर्मनी
नितेश राणे – नेदरलँड
आशिष शेलार – स्पेन
देवेंद्र फडणवीस व उदय सामंत – दावोस, स्वित्झर्लंड