शिवसेनेत कार्यकर्त्यांपेक्षा पदाधिकारीच जास्त; कोणाचं ऐकायचं पडला प्रश्न (फोटो सौजन्य-X)
नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेशासाठी इच्छुकांची गर्दी वाढताना दिसत आहे. त्यातच येईल त्याला पक्षाची पदे वाटप केली जात आहेत. असे असताना तीन वर्षात पक्षात पदाधिकाऱ्यांची गर्दी झाली असून, कार्यकर्ते मात्र थोडेफारच शिल्लक राहिल्याचे चित्र दिसू लागले आहे. एकट्या नाशिक जिल्ह्याचेच उदाहरण घेतल्यास शहरातील अवघ्या तीन विधानसभा मतदारसंघासाठी सहा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्याने नेमके कोणाचे ऐकायचे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडू लागला आहे.
पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे नाशिकसह उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आलेली असताना स्थानिक गटबाजीतून चौधरींच्या विरोधातही तक्रारी करण्यात आल्याने त्यांच्यासोबत राम रेपाळे यांना संपर्कप्रमुखपदी नेमणूक करून नाशिकची जबाबदारी देण्यात आली. तर स्थानिक म्हणून जयंत साठे यांच्याकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली.
तसेच ठाकरे सेनेतून आलेले विजय करंजकर यांच्याकडे नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघ नेतृत्वासाठी देण्यात आले. एवढ्यावरच पदाधिकारी नेमणुकीची प्रक्रिया सिमीत करण्यात आली नाही तर राजू लवटे यांना सहसंपर्क म्हणून नेमण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण-भात तूप खाऊन? बाजीराव पेशवे सुद्धा मांसाहार करत; खासदार संजय राऊतांचा दावा
आता राजू लवटे यांच्याकडे शहरातील मध्य, पश्चिम, पूर्व या तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली. त्याचवेळी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांची नेमणूक या तीन विधानसभा मतदारसंघासाठी करण्यात आली तर उर्वरित जिल्ह्यासाठी अनिल ढिकले यांची जिल्हाप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे.
शिवसेनेत कार्यकर्त्यांना विविध पदं अन् नेमणुका
प्रवीण तिदमे यांच्याकडे महानगरप्रमुखपद देण्यात आल्याने साहजिकच त्यांच्यावर शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे. आता विलास शिंदे यांनाही महानगरपालिका क्षेत्रासाठी प्रभारी संपर्कप्रमुखपद देण्यात आल्याने पक्ष संघटनेसाठी भरभक्कम फळी निर्माण करण्यात आल्याचे दिसत आहे. असे असले तरी पक्षाची धुरा वाहण्यासाठी विधानसभा विस्तारक, विभागप्रमुख अशी विविध पदे निर्माण करून त्यावर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.