अमित शाहांचा तीन दिवसीय दौरा (Photo Credit- Social Media)
नांदेड : येत्या काही महिन्यांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. त्यात नांदेडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सज्ज झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. या सभेतूनच भाजप निवडणुकीचा शंखनाद फुंकणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री शहा हे 25 ते 27 मे असे तीन दिवस महाराष्ट्राचा दौऱ्यावर असणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ते पहिल्यांदाच नांदेडला येत आहेत. या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत नवीन मोंढा मैदानावर भाजपाची जाहीर सभा पार पडणार आहे. भाजपकडून या सभेला शंखनाद असे नाव देण्यात आले आहे.
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’चे यश, सैन्याचा गौरव, विकसित भारतचा शंखनाद असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. परंतु, या सभेच्या माध्यमातून भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा शंखनाद फुंकणार आहे. मराठवाड्यातील भाजप पदाधिकारी या सभेला हजेरी लावणार असल्याची माहिती दिली जात आहे.
एप्रिल महिन्यातही अमित शहा आले होते महाराष्ट्रात
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे यापूर्वी एप्रिल महिन्यात दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावेळी त्यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली. त्यानंतर मुंबईत त्यांचे कार्यक्रम झाले. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनाला गेल्याची माहिती आहे. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.
चार महिन्यांत निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालय
महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगर पंचायतींची निवडणूक प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशाप्रकारे, कोरोना काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत. दरम्यान, आता निवडणूक आयोगाने देखील याबाबत महत्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.