'दोन महिन्यांत मिसिंग लिंकवर खड्डे... आणि मुख्यमंत्री म्हणतात, ही तर टेस्टिंग' वर्षा गायकवाड यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात
मुंबई-पुणे मार्गावरील महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू होऊन अवघे दोन महिने होत असतानाच पहिल्याच पावसात काही ठिकाणी खड्डे पडल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारवर टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण देत प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेचे समर्थन केले आहे.
१ मे रोजी मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आलेल्या या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पहिल्याच पावसानंतर काही भागात खड्डे पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावरून आता काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.
‘एक दिवस उद्धव ठाकरेंना आमच्याकडे यावंच लागेल’; रामदास आठवलेंचा दावा, आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला
वर्षा गायकवाड आपल्या अधिकृत ‘X ‘ पोस्टवरून म्हणाल्या, “दोन महिन्यांत महामार्गावर खड्डे… आणि मुख्यमंत्री म्हणतात, ही तर टेस्टिंग! कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकवर अवघ्या दोन महिन्यांत खड्डे पडतात… पण त्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी मुख्यमंत्री म्हणतात पहिल्या पावसानंतर रस्त्याची टेस्ट होते. म्हणजे आता प्रवाश्यांचा जीव आणि प्रवास हा टेस्टिंग लॅब झाला आहे का? आणि पहिल्या पावसात महामार्गावर टेस्टिंग होते तर या काळात टोल वसुली थांबली का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दोन महिन्यांत महामार्गावर खड्डे… आणि मुख्यमंत्री म्हणतात, ही तर टेस्टिंग! कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकवर अवघ्या दोन महिन्यांत खड्डे पडतात… पण त्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी मुख्यमंत्री म्हणतात पहिल्या पावसानंतर रस्त्याची टेस्ट होते.
म्हणजे आता प्रवाश्यांचा… pic.twitter.com/x2prVQjjan — Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 4, 2026
त्या पुढे म्हणाला, “खड्डे पडले तर ती टीका नाही, तर वास्तव आहे. करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या महामार्गावर दोन महिन्यांत खड्डे पडत असतील, तर प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार आहे. दुर्दैव म्हणजे, अपयश मान्य करण्याऐवजी सरकार टीका करणाऱ्यांनाच दोष देत आहे. असो..रस्ते मजबूत नाहीत, पण सरकारचे स्पष्टीकरण मात्र मजबूत आहे!”
मिसिंग लिंकवरील पडलेल्या खड्ड्यांवरून स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले, “मिसिंग लिंकवर सर्वत्र खड्डे पडलेले नाहीत. कनेक्टरजवळ फक्त दोन खड्डे पडले आहेत. मात्र काही लोकांना कुठल्याही गोष्टीचा बाऊ करून ती मोठी करून दाखवण्यात आनंद मिळतो.”
ते पुढे म्हणाले, “कोणतेही मोठे काम पूर्ण झाल्यानंतर आणि पहिला पाऊस पडल्यानंतर रस्त्याची टिकाऊ क्षमता तपासली जाते. त्या काळात काही तांत्रिक बाबी समोर येतात आणि त्यानुसार आवश्यक दुरुस्ती केली जाते.”
फडणवीस यांनी या प्रकरणावर बोलताना प्रसिद्ध म्हणीचाही उल्लेख केला. “निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे टीका होत असेल तर हरकत नाही. एमएसआरडीसी योग्य ती काळजी घेईल आणि आवश्यक त्या सुधारणा करेल,” असे त्यांनी सांगितले.
रस्त्यावर वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, “नवीन उड्डाणपूल किंवा रस्ता तयार झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मॅस्टिक ॲस्फाल्ट काही प्रमाणात स्थिरावतो. त्यानंतरच तो पूर्ण क्षमतेने कार्य करतो. या सर्व प्रक्रिया इंजिनिअरिंगचा भाग आहेत. कुठे काही कमतरता आढळल्यास त्या निश्चितपणे दूर केल्या जातील.”






