'आम्ही जमिनीवर पाय ठेवून चालणारी माणसं, एकहाती सत्ता राखणे हे काय...'; अजित पवारांचं मोठं विधान (संग्रहित फोटो)
जालना : नगरपरिषदांसह इतर स्थानिक निवडणुका घेतल्या जात आहेत. त्यानुसार, प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. असे असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जालना जिल्ह्यातील परतूर नगरपरिषद निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली. यामध्ये त्यांनी बरेच वर्ष राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत याची खंत आहे. अनेक सहकारी स्थानिक स्वराज्य संस्थेतून वर आलेले आहेत. मी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी पुढे गेलेला कार्यकर्ता असल्याचे ते म्हणाले.
जालना येथे अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘मी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी पुढे गेलेला कार्यकर्ता आहे. या सगळ्या महान विभूतींना मी अभिवादन करतो. लोकांचे प्रश्न समजून घेताना आपण कुठे जातीभेद करत नाही. एकहाती सत्ता राखणे हे काय येड्या गबाळ्याचे काम नाही. आम्ही जमिनीवर पाय ठेवून चालणारे माणसं आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मित्रांनो काळजी करू नका अजून चिन्ह वाटप व्हायचंय. आम्हाला वेळ खूप कमी आहे’.
हेदेखील वाचा : Local Body Election: “कोणत्याही परिस्थितीत महायुती…”; अर्ज मागे घेताना पवारांच्या उमेदवाराचे मोठे विधान
तसेच तुमच्या सारख्यांच्या पाठिंब्यामुळे मी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाला आहे. विरोधात राहून लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही, मोर्चे काढता येतात, आंदोलनं करता येतात. आता गेले तीन-चार वर्षे इथे अधिकारीच टिकत नाही. माझ्याकडे प्रत्येक अधिकारी तीन वर्षे टिकतो. टाळी एका हाताने वाजत नाही. कार्यकर्त्यालाही मान-सन्मान मिळाला पाहिजे मग त्याला संधी नको का?
बारामती शहर विकासाचं मॉडेल
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, ‘आज बारामती शहर विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जातं. पिंपरी-चिंचवड महापालिका 25 वर्षे माझ्या ताब्यात होती. तुम्ही घड्याळाचं चित्र दाबा तुम्हाला पुढचे पाच वर्षे निधीची कमतरता पडू देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली तर बदल घडून दाखवू. आम्ही करून दाखवलं आहे. जातीय सलोखा आपल्याला ठेवायचा आहे. प्रत्येकाला एकमेकांच्या सणामध्ये सहभागी व्हायचंय. स्मार्ट सिटीची योजना आणलीये त्याचाही आपण फायदा घेऊ, असे ते म्हणाले.






