महापालिका निवडणुकीत यंदा एमआयएमला राज्यभरात चांगले यश मिळाले. मुंब्रा मुंबई येथील पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी, कैसा हराया म्हणत पूर्ण मुंब्रा हिरवा करू, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, या वक्तव्याचे आता राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या वक्तव्याविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. तर महायुतीतील शिवसेनेसह भाजपदेखील या वक्तव्यावर एमआयएमचा समाचार घेत आहे.
रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ज्यांनी हा शब्द वापरला त्यांनी माफीनामाही दिलाय, आणि हा (इम्तियाज जलील) जाऊन तिथे तेल टाकतो. ही जी काही सापाची पिलावळ आहे अशा लोकांना ठेचले पाहिजे, असा जोरदार हल्लाबोल शिरसाटांनी केला.
राजकारणात भूकंप! अखेर ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र, BJP कोमात
काही ठिकाणी त्यांचे नगरसेवक निवडून आलेही असतील, त्याचा आनंद आहे परंतु, ताबडतोब एक भूमिका बदलून हिंदुस्थान-पाकिस्तान करण्याची भाषा ते करायला लागले आहेत. तुम्हाला एवढी मस्ती असेल तर पाकिस्तानात जा. याठिकाणी असलेल्या मुसलमान आणि हिंदूंमध्ये द्वेष पसरवू नका, इथला माणूस शांततेत राहतोय त्याला शांततेतच राहू द्या, अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असा इशारा देखील मंत्री शिरसाट यांनी जलील यांना दिला.
मंत्री शिरसाट पुढे म्हणाले, हा शिवरायांचा भगवा आहे. हे संत महात्म्यांचे प्रतीक आहे. हा भगवा कोणा जातीधर्माच्या नाही. ज्या पद्धतीने तुम्ही जातीवर बोलता त्यापद्धतीने आम्ही बोलत नाही. काल जलील यांनीही त्यांच्या गळ्यात भगवा घातला होता, त्याला कोणी आक्षेप घेतला का ? आम्हाला याबद्दल द्वेष नाही. तुम्हाला भगव्याचे वावडे असेल तर तुम्ही परिधान करू नका. मात्र, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती आम्ही जपणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, जलील यांच्या ‘महाराष्ट्र हिरवा करू’ या वक्तव्याचा समाचार घेताना भाजपचे आ. केणेकर जलील यांना उद्देशून म्हणाले, हा महाराष्ट्र तुझ्या बापाचा नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा आहे. येथे प्रभू रामचंद्रांची संस्कृती वाहतेय. यापुढेही येथे भगवा रंगच चालणार. महापालिकेत निवडून आलेले नगरसेवक हे पावसाळ्यातील छत्र्या आहेत, आम्ही त्या कधीही काढून फेकू. त्यांना परत हैदराबादला पाठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी भूमिकाही आ. केणेकर यांनी बोलून दाखवली.






