जितेंद्र आव्हाडांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देणारी Sahar Shaikh कोण आहे? (Photo Credit- X)
राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी १३ महानगरपालिकांमध्ये एमआयएमने आपली मजबूत उपस्थिती नोंदवत एकूण १२५ जागांवर विजय मिळवला आहे. एकट्या ठाणे महानगरपालिकेत पक्षाचे ५ उमेदवार निवडून आले आहेत. या विजयातील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक ३०. येथे एमआयएमच्या संपूर्ण पॅनलने दणदणीत विजय मिळवला असून, आव्हाडांचे एकेकाळचे कट्टर समर्थक युनूस शेख यांच्या कन्या सहर शेख यांनी मुंब्र्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे.
विजयानंतर नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी काढलेली विजयी मिरवणूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये सहर शेख यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. त्या म्हणतात, पुढील निवडणुकीत आम्ही संपूर्ण मुंब्रा विधानसभा मतदारसंघ जिंकू. आम्ही आमच्या विरोधकांना येथून हाकलून लावू आणि मुंब्र्यातील प्रत्येक उमेदवार एआयएमआयएमचाच असेल. येत्या काळात संपूर्ण मुंब्रा ‘हिरवा’ होईल.” त्यांच्या या विधानामुळे मुंब्रा-कळवा पट्ट्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
Youngest AIMIM elected councilor Sahar Shaikh from Mumbra#BMCElection2026 https://t.co/TVAsjHXohW pic.twitter.com/QpCI6tk7kD — Adil (@_Adil_Waseem) January 20, 2026
सहर शेख या जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळी उजवे हात मानले जाणारे युनूस शेख यांच्या कन्या आहेत. आव्हाड आणि युनूस शेख यांची अनेक वर्षांची मैत्री आता कट्टर राजकीय शत्रुत्वात बदलली आहे. सहर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण वर्ग आणि महिलांची मोठी फळी उभारली होती, ज्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. सहर यांच्यासोबतच नफीस अन्सारी, शेख सुलताना आणि डोंगरे शोएब फरीद यांनीही मुंब्र्यात मोठे विजय मिळवले आहेत.
मुंब्रा आणि कळवा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील संघर्षाचा थेट फायदा ओवेसींच्या ‘पतंग’ला झाला आहे. गेल्या निवडणुकीत मुंब्र्यात एमआयएमचे फक्त २ नगरसेवक होते, ती संख्या आता ५ वर पोहोचली आहे.
विजयानंतर युनूस शेख यांनीही जितेंद्र आव्हाडांना जाहीर इशारा दिला आहे. ते म्हणाले, “माझ्या नादी लागू नका, अन्यथा मी परिस्थिती आणखी बिकट करेन. तुम्ही ज्यांना घेऊन फिरत आहात ते काहीच नाहीत, खरे सिंह आमच्याकडे आहेत. जर तुम्ही आमच्या वाटेला आलात, तर त्याचे परिणाम भयानक होतील. जितेंद्र आव्हाड गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत, मात्र सहर शेख यांच्या या विजयाने आव्हाडांच्या गडाला मोठे आव्हान उभे केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मुंब्र्यात ‘आव्हाड विरुद्ध एमआयएम’ असा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.






