भारतीय ज्योतिषशास्त्रात व्यक्तीचा स्वभाव, वागणूकीचा अंदाज कुंडलीनुसार लावता येतो. याचप्रमाणे एखादी व्यक्ती ज्या दिवशी जन्माला येते त्या जन्म वाराचा मोठा प्रभाव आयुष्यावर होत असतो. प्रत्येक वाराशी एक विशिष्ट ग्रह संबंधित असतो आणि त्या ग्रहाचे गुणधर्म संबंधित व्यक्तीमध्ये दिसून येतात,कसं ते जाणून घेऊयात…
सोमवार: सोमवारी जन्मलेली माणसं भावनाशील, प्रेमळ आणि सहानुभूती असलेली असतात. त्यांना सौंदर्य आणि शांतता प्रिय असते. चंद्राच्या प्रभावामुळे ही मंडळी थोडी चंचलही असू शकतात.ही माणसं काही प्रमाणात भावनिक असल्याने नातेवाईकांशी जुळवून घेणं सोपं जातं, पण अतिभावनिकपणा काही वेळेस यांना दुबळं करतो.
मंगळवार: मंगळवारी जन्मलेले लोक धाडसी, उत्साही आणि थोडे आक्रमक स्वभावाचे असतात. त्यांच्यात नेतृत्वगुण आणि स्पर्धात्मक वृत्ती असते. मंगळाच्या प्रभावामुळे काही वेळा हे लोक रागीट किंवा हट्टी होऊ शकतात. काही वेळेस झपाट्याने निर्णय घेणं, लढाऊ वृत्ती. कधी रागावर नियंत्रण नसल्यामुळे अडचणी येतात.
बुधवार: बुधवारी जन्मलेली व्यक्ती हुशार, बोलकी, आणि चतुर असते. त्यांना संवादाची कला चांगली अवगत असते. ते व्यावसायिक दृष्टिकोनाने यशस्वी होतात.पण काही वेळा अस्थिर स्वभावामुळे अतिविचार करतात आणि निर्णय चुकतात.
गुरुवार: गुरुवारी जन्मलेली व्यक्ती ज्ञानी, धार्मिक आणि नैतिकतेला महत्त्व देणारी असते. त्यांनी घेतलेले निर्णय दूरदृष्टीने असतात. शिक्षक, गुरू किंवा सल्लागार होण्यासाठी हे लोक उपयुक्त असतात.
शुक्रवार: शुक्रवारी जन्मलेली माणसं कलात्मक, आकर्षक आणि प्रेमळ असतात. त्यांना सौंदर्य, संगीत आणि आराम प्रिय असतो. त्या सौंदर्यदृष्टीने समृद्ध जीवन जगतात.
शनिवार: शनिवारी जन्मलेली व्यक्ती गंभीर, मेहनती, संयमी आणि शांत असते. त्यांना यश उशिरा मिळतं, पण टिकून राहतं. शिस्त आणि कष्ट यांचा त्यांना अभिमान असतो. यांना हवं ते मिळायला उशीर होतो पण जेव्हा ही मिळतं तेव्हा कशाचीही कमी पडत नाही.
रविवार: रविवारी जन्मलेली व्यक्ती आत्मविश्वासी, सर्जनशील आणि नेतृत्वक्षम असते. सूर्यप्रभावामुळे त्यांच्यात आत्मतेज आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतं. या मंडळींना समाजात महत्त्व मिळवतात, पण अहंकार टाळणे गरजेचे आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)