फोटो सौजन्य- pinterest
भारतीय मन निसर्गत:च उत्सवांचा आणि परंपरांचा आदर करणारे आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आणि कृषीशी संबंधित जीवनशैलीत पोसल्या गेलेल्या भारतीय समाजमनाला निसर्गाचा सोहळा साजरा करावासा वाटला तर त्यात नवल ते काय! हुताशनी पौर्णिमा अर्थात होळीचा सणही याला अपवाद नाही. विविध राज्यात होळीचा सण कसा साजरा केला जातो, जाणून घ्या
बंगाल प्रांतात गौडीय वैष्णव उत्सव म्हणून होळीचे महत्त्व अविवाद्य आहे. भगवान कृष्ण आणि होळी यांचा एक अविभाज्य संबंध भारतीय संस्कृतीत मान्यता पावलेला आहे. उत्तर भारतातील वृंदावन, मथुरा या ठिकाणी कृष्ण मंदिरांमध्ये होळीचा सण उत्साहाने आणि पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो. नंदगावहून आलेले पुरुष स्वत:ला गोपजन असे संबोधतात आणि स्त्रिया या गोपी असल्याचे मानले जाते.
बरसाना येथील श्रीजी मंदिरातील ‘लाठमार होळी’ प्रसिद्ध आहे. हातात रंगीत लाकडी लाठया घेतलेल्या महिला पुरुषांना लाठीने मारतात आणि पुरुष स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतात, असा एक सोहळा होतो. रंगांची उधळण करीत स्त्रिया आणि पुरुष एकत्र नृत्य करतात.
बलराम मंदिर परिसरातही रंगांची उधळण केली जाते. राधावल्लभ मंदिरात राधा आणि कृष्ण यांचा विवाह साजरा करून होळीचा आनंद वाढविला जातो. लोकगीते म्हणत लोकनृत्याचा आनंद घेत उत्तर भारतीय भक्त होळीचा आनंद लुटतात.
दक्षिण भारतात मात्र भगवान शंकराने कामदेव मदनाला दिलेल्या शापाचा संदर्भ होळीशी जोडला गेला आहे. बंगाल आणि ओडिशामध्ये या काळात ‘दोलोत्सव’ साजरा केला जातो.
गोव्यामधील मंदिरांमध्ये होळी पौर्णिमेनिमित्त देवांची पालखी निघते. महाराष्ट्राच्या कोकण प्रांतामध्ये शिमगोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. ग्रामदेवतेची पालखी, शिमग्याची पारंपरिक सोंगे यांचे विशेष मानाचे स्थान कोकणच्या भूमीत रुजलेले अनुभवायला मिळते. महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. होळीला नारळ अर्पण करून तो खरपूस भाजलेला नारळ प्रसाद म्हणून स्वीकारला जातो. महिला होळीची पूजा करतात, तिला प्रदक्षिणा घालतात. काही कुटुंबात होळीच्या दिवशी घरातील देवघरासमोर छोटीशी होळी प्रज्वलित करण्याचीही पद्धत आहे.
उत्तर भारतातही होळी आणि रंगपंचमीचा सण आनंदाने साजरा केला जातो. कामानिमित्त कुटुंबापासून लांब असलेली मंडळी आवर्जून होळीला येतात. मिठाई भेट दिली जाते. आवर्जून पांढरे कपडे घालून एकमेकांवर रंगांची उधळण केली जाते. नृत्याचा आनंद घेतला जातो.
एकूणच माणसाच्या शरीर मनाला उल्लसित करणारा, वसंत ॠतूचे स्वागत करणारा, वाईट विचारांची आणि प्रवृत्तींची राखरांगोळी करायला शिकविणारा होळीचा सण! देशातील विविध भागातही आनंदाने साजरा केला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: होळीमागे भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची कथा प्रचलित आहे. वाईट प्रवृत्तींचा नाश आणि भक्तीचा विजय याचे प्रतीक म्हणून होलिका दहन केले जाते.
Ans: मथुरा आणि वृंदावन येथे भगवान श्रीकृष्णाशी होळीचा संबंध जोडला जातो. येथे रंगोत्सव, फुलांची होळी आणि लाठमार होळी अशा पारंपरिक पद्धतीने सण साजरा केला जातो.
Ans: महाराष्ट्रामध्ये होळी पौर्णिमेला होलिका दहन करून दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. कोकणात शिमगोत्सव, ग्रामदेवतेच्या पालख्या आणि पारंपरिक सोंगे ही खास वैशिष्ट्ये आहेत.






