फोटो सौजन्य- pinterest
सनातन धर्मामध्ये व्रत आणि सणांना विशेष महत्त्व आहे. त्यापैकीच एक व्रत म्हणजे महालक्ष्मी व्रत. या व्रताच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. देवी लक्ष्मीला पद्मा, रमा, कमला, इंदिरा, विष्णुप्रिया, हरिप्रिया, भार्गवी आणि महालक्ष्मी असेही म्हटले जाते. हे व्रत 15 दिवस उपवास आणि पूजा करुन देखील केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती विधीनुसार महालक्ष्मीचा उपवास करतो, त्याच्या घरात देवी लक्ष्मी प्रवेश करते ज्यामुळे त्या व्यक्तीच्या घरामध्ये धन आणि समृद्धी वाढते. महालक्ष्मी व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे? आणि या व्रताचे महत्त्व काय आहे ? जाणून घ्या
पंचांगानुसार, महालक्ष्मी व्रत भाद्रपद शुक्ल अष्टमी तिथी शनिवार, 30 ऑगस्ट रोजी रात्री 10.46 वाजता सुरु होणार आहे आणि ही तिथी सोमवार, 1 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12.57 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार महालक्ष्मी व्रताची सुरुवात आज रविवार, 31 ऑगस्टरपासून होत आहे.
रविवार, 31 ऑगस्ट रोजी महालक्ष्मी व्रताचा ब्रह्म मुहूर्त पहाटे 4.29 ते 5.14 पर्यंत आहे. या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी 11.56 ते दुपारी 12.47 पर्यंत आहे. या दिवशी चंद्रोद्य दुपारी 1.11 वाजता होईल. तर महालक्ष्मी व्रताच्या पहिल्या दिवशी वैधृती योग पहाटेपासून दुपारी 3.59 पर्यंत राहील. त्यानंतर विष्कांब योग तयार होत आहे. तसेच त्या दिवशी अनुराधा नक्षत्र सकाळपासून 5.27 पर्यंत असते. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र असते.
पंचांगानुसार, 31 ऑगस्टपासून सुरु होणारे महालक्ष्मी व्रताची समाप्ती 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करुन उपवास सोडला जाईल.
महालक्ष्मी व्रताच्या दिवशी सकाळी आवरुन झाल्यानंतर १६ कच्च्या कापसाच्या धाग्याची दोरी बनवा. त्यात १६ गाठी बांधा आणि त्यावर हळदीचा रंग लावा. त्यावर १५ दिवस सतत दुर्वा आणि गहू अर्पण करा. मातीच्या भांड्यात महालक्ष्मीची मूर्ती स्थापित करा. त्यानंतर विधीनुसार पूजा करा. त्यानंतर महालक्ष्मी व्रत कथा ऐका.
महालक्ष्मी व्रताच्या दिवशी भद्रा काळ आहे. भद्राची सुरुवात सकाळी 5.59 वाजता होईल आणि त्याची समाप्ती सकाळी 11.54 वाजता होईल. या काळात भद्राचा पृथ्वीवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही कोणतेही शुभ काम किंवा पूजा करु शकता.
महालक्ष्मी व्रत ही धार्मिक परंपरा नाही तर भक्ती आणि श्रद्धेने जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा एक मार्ग आहे. मान्यतेनुसार या व्रताच्या दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात. आर्थिक स्थिरता येते आणि कुटुंबात सुख-समृद्धी राहते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)