Osho World: जर मनाचा आरसाच नसेल, तर धूळ कुठे बसेल? 'या' ओशोंच्या कथेत दडलेले आहे आत्मसाक्षात्काराचे रहस्य ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Self realization secrets Osho philosophy : आजच्या धावपळीच्या आणि मानसिक तणावाच्या युगात प्रत्येक जण शांतता आणि सत्याच्या शोधात भटकत आहे. इंटरनेटवर ज्ञानाचा महापूर आला आहे, पुस्तकांची दुकाने आध्यात्मिक मार्गदर्शनाने भरलेली आहेत; परंतु तरीही माणसाचे मन अशांतच आहे. यामागचे सर्वात मोठे कारण अध्यात्माचे प्रसिद्ध विचारवंत ओशोंनी अत्यंत सोप्या भाषेत मांडले आहे. ओशो (Osho) म्हणतात की, सत्याबद्दल माहिती असणे आणि सत्य स्वतः अनुभवणे या दोन संपूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. केवळ शास्त्र पाठ केल्याने किंवा शब्दांचे पाठांतर केल्याने कोणी ज्ञानी होत नाही. खरे ज्ञान हे जेव्हा मनातील सर्व कल्पनाविलास, अहंकार, पूर्वग्रह आणि सतत चालणारी विचारांची चक्रे पूर्णपणे शांत होतात, तेव्हाच प्रकट होते. चीनमधील एका प्रसिद्ध झेन कथेचा दाखला देत ओशोंनी हा गूढ मार्ग उलगडून दाखवला आहे.
कथेची सुरुवात एका जिज्ञासू तरुणाने होते, जो एका महान झेन गुरूंच्या आश्रमात पोहोचतो. तो गुरूंना म्हणतो, “मला परम सत्य जाणून घ्यायचे आहे.” त्यावर गुरूंनी त्याला एक अत्यंत विक्षिप्त वाटणारा प्रश्न विचारला, “तुला खरेच सत्य जाणून घ्यायचे आहे, की फक्त सत्याबद्दल माहिती हवी आहे?” हा प्रश्न ऐकून तो तरुण गोंधळात पडला. त्याने नम्रपणे विचारले की, या दोन्हीमध्ये काय फरक आहे? तेव्हा गुरूंनी स्पष्ट केले की, सत्याबद्दल माहिती मिळवणे अतिशय सोपे आहे. तुम्ही कोणतेही पुस्तक वाचून, पंडितांचे ऐकून ती मिळवू शकता. पण सत्य स्वतः जाणण्यासाठी बुद्धीचा दिवा लावावा लागतो, स्वतःला पूर्णपणे विसरून जावे लागते. या उत्तराने प्रभावित होऊन त्या तरुणाने गुरूंचे पाय धरले आणि म्हणाला, “मला माहिती नको, मला ते सत्य अनुभवायचे आहे, त्यासाठी मला जी काही किंमत मोजावी लागेल ती मी मोजायला तयार आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पेंटागॉनमध्ये हाय-ड्रामा! ‘Hazmat Alert’मुळे लष्करी मुख्यालयात लॉकडाऊन, पोलीस गॅस मास्कमध्ये; नेमके काय घडले वॉशिंग्टनमध्ये?
त्या तरुणाची तयारी पाहून गुरूंनी त्याला हिमालयात तपश्चर्या करायला किंवा ग्रंथ वाचायला सांगितले नाही. त्यांनी त्याला एक अत्यंत साधे, पण कठीण काम दिले. आश्रमातील ५०० साधूंसाठी रोज सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तांदूळ कांडण्याचे (धान्य मळणीचे) काम त्याच्यावर सोपवण्यात आले. गुरूंनी सांगितले, “फक्त तांदूळ फोडत राहा, मनात कोणताही विचार आणू नको आणि कोणाशीही वादात पडू नको. हेच तुझे ध्यान आहे.” सुरुवातीला त्या तरुणाच्या मनात अनेक जुने विचार आले, परंतु जेव्हा मनाला नवीन विचारांचे खाद्य मिळणे बंद झाले, तेव्हा हळूहळू त्याचे मन थकले. दिवसभर शारीरिक कष्ट करून तो तिथेच झोपायचा आणि सकाळी पुन्हा कामाला लागायचा. पाहता पाहता १-२ वर्षे नव्हे, तर तब्बल १२ वर्षे उलटून गेली. तो तरुण पूर्णपणे शांत झाला, त्याचे अस्तित्वच जणू त्या तांदूळ कांडण्याच्या प्रक्रियेत विरघळून गेले.
बारा वर्षांनंतर जेव्हा गुरूंचा अंत जवळ आला, तेव्हा त्यांनी आपला उत्तराधिकारी निवडण्यासाठी आश्रमात एक घोषणा केली. त्यांनी सांगितले की, ज्याने परम सत्याचा अनुभव घेतला असेल, त्याने माझ्या दारावर चार ओळी लिहाव्यात. आश्रमातील सर्वात विद्वान मुख्य पंडिताने रात्रीच्या अंधारात गुरूंच्या दारावर लिहिले: “मन हा एक आरसा आहे, ज्यावर विचार आणि वासनांची धूळ साचते. ती धूळ झटकणे म्हणजेच ज्ञान होय. ज्याने मन शुद्ध केले, त्याला मोक्ष मिळाला.” सकाळी जेव्हा गुरूंनी हे वाचले, तेव्हा ते रागाने म्हणाले, “हा कोणत्या मूर्खाने माझ्या दारावर कचरा लिहिला आहे?” संपूर्ण आश्रम चक्रावून गेला, कारण त्या ओळी खूप सुंदर होत्या. पण गुरूंच्या नजरेत ते केवळ पुस्तकी ज्ञान होते, त्यात स्वतःचा कोणताही जिवंत अनुभव नव्हता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Donald Trump : वॉशिंग्टनमधील नॅशनल मॉलच्या गवतावर 8647 हा कोड; ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी ‘ही’ कसली धमकी?
तांदूळ कांडणाऱ्या त्या साध्या शिष्याने जेव्हा ही चर्चा ऐकली, तेव्हा तो हसला. त्याला लिहिता येत नव्हते, म्हणून त्याने दुसऱ्या एका साधकाकडून त्याच दारावर आपल्या ओळी लिहून घेतल्या. त्या ओळी अशा होत्या: “मनाचा आरसाच नसतो, मग धूळ कुठे बसणार? हे ज्याला ठाऊक आहे, त्यालाच सत्य कळले.” या ओळी वाचताच गुरूंच्या आनंदाला पारावार राहिला. मध्यरात्री गुरु स्वतः त्या शिष्याजवळ गेले, त्याला उठवले आणि आपली काठी व झगा त्याच्या स्वाधीन करून त्याला आपला खरा वारसदार घोषित केले. गुरूंनी त्याला लगेच आश्रम सोडायला सांगितले, कारण आश्रमातील मोठे पंडित एका साध्या काम करणाऱ्या मजुराला गुरु म्हणून स्वीकारू शकणार नाहीत, अशी भीती होती.
ओशोंच्या या कथेचे सार हेच आहे की, जोपर्यंत आपण स्वतःला ‘कोणीतरी ज्ञानी’ समजतो, तोपर्यंत आपला अहंकार शिल्लक असतो. जेव्हा मन आरशाच्या कल्पनेच्याही पलीकडे जाऊन पूर्णपणे शून्य होते, तेव्हाच खऱ्या सत्याचा जन्म होतो.






