फोटो सौजन्य- pinterest
ॐ नमोजी शिवा अपरिमिता |
आदि अनादि मायातीता ॥
पूर्णब्रह्मानंदशाश्वता ॥
हेरंबताता जगद्गुरो ॥१॥
गेल्या अनेक वर्षांपासून या ओवीपासून सुरू झालेली शिवलीलामृताची पारायणे केवळ महाराष्ट्रच नव्हे; तर देशभरातील शिवभक्तांकडून आजही नित्याने केली जातात. कोणत्याही कर्मकांडाशिवाय या ग्रंथाचे पठण करण्याची मुभा असल्याने हा ग्रंथ सर्व प्रकारच्या समाजामध्ये रुजला. त्याची लोकप्रियता इतकी, की भारतातल्या कानाकोपऱ्यातील शिवभक्तांना या ग्रंथातील अनेक ओव्या तोंडपाठ आहेत. भगवान शिवाच्या अगाध लीलेचे सार सांगणारा हा ग्रंथ २३ फेब्रुवारी १७१९ मध्ये मूळचे पंढरपूर गावाजवळचे असणाऱ्या श्रीधर स्वामी यांनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. काशी विश्वेश्वराच्या मंदिरात बसून हा संपूर्ण ग्रंथ त्यांनी रचला. या ग्रंथामध्ये एकूण १४ अध्याय असून श्रीधर स्वामींनी त्यामध्ये २४५० ओव्यांची रचना केली आहे. मराठी भाषेत लिहिलेला हा ग्रंथ कालांतराने अनेक भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आला. या ग्रंथाविषयी आणि श्रीधर स्वामी यांच्याविषयी इतिहास अभ्यासक चिंतामणी नीळकंठ जोशी यांनी विपुल संशोधन केले आहे. त्यानुसार श्रीधर स्वामी हे आनंद संप्रदायाचे होते. सर्व समाजातील शिवभक्तांना भगवान शिवाचे नित्य स्मरण करता यावे, यासाठी स्वामींनी या ग्रंथाची रचना केली.
शिवलीलामृत ग्रंथ सोवळ्याविना वाचता येईल असा, शिवाय कोणताही विशिष्ट अध्याय वाचण्याचे बंधन नसलेला, स्त्रियांनाही पारायण करता येईल, असा हा ग्रंथ असल्याने त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. आज देशभरात याचे पारायण होत असतात. यातील भाषाही अत्यंत सोप्पी असल्याने सहज आणि स्पष्ट उच्चार करून वाचता येते.
भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे. या पोथीचे पारायण करण्याच्या अनेक पद्धती आहेत. सर्व उपासनांत नित्य नियम पाहिजे. दुर्जनांचा संग टाळावा. चित्त शांत असावे. विकल्प धरू नये. श्रद्धा ठेवावी. संकल्प करून पठणास प्रारंभ करावा. शिवरात्रीचा उपवास, शिव पूजन, शिव दर्शन, त्या दिवशी शिव मंत्रजाप, शिवलीलामृत पारायण यांनी सर्व कामनापूर्ती होते.
बेलाची पाने, पांढरी फुले, दूध, शुद्ध जल, अभिषेक करण्याचे स्वच्छ भांडे, दही-भाताचा नैवेद्य या साऱ्या गोष्टी भगवान शंकराला प्रिय मानल्या जातात. त्यामुळे यांचे शिवपूजेत फार महत्त्व आहे.
सोमवारी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी पंधरा अध्यायांचे एक संपूर्ण पारायण करावे. यावेळी काही नियम व पथ्य पाळणे आवश्यक आहे..
स्नान केल्यानंतर एकांतात पवित्रपणे बसून शिवाची पूजा करून पारायण करावे. मद्य, मांस भक्षण करू नये. पारायण चालू असता सात अध्यायानंतर घटकाभर विश्रांती घ्यावी. त्या अवधीत देह धर्म आवरावे. दूध, फळे भक्षण करावीत. हात, पाय, तोंड स्वच्छ धुवून पुन्हा आसनस्थ व्हावे आणि पाठ पूर्ण करावा. पारायणानंतर ॐ नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा १०८ वेळा रुद्रमालेवर जप करावा.
सोमवारी पंधरा अध्यायांचे एक संपूर्ण पारायण करावे. रोज एक पारायण याप्रमाणे ७ दिवस ७ पारायणे करावीत किंवा
कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन ११ बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद ( जी इष्ट कामना असेल ती बोलून ) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे ७ दिवसांत पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे, अशी प्रार्थना करावी आणि तेथे किंवा स्वत:च्या घरी येऊन रात्रीच्या शूचिर्भूत होऊन भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी.
सोमवार – अध्याय १ व अध्याय २
मंगळवार – अध्याय ३ व अध्याय ४
बुधवार – अध्याय ५ व अध्याय ६
गुरुवार – अध्याय ७ व अध्याय ८
शुक्रवार – अध्याय ९ व अध्याय १०
शनिवार – अध्याय ११ व अध्याय १२
रविवार – अध्याय १३ व अध्याय १४
रविवारी रात्री अध्याय १५ वा वाचला तर चांगलेच, पण नाही वाचला तरी चालतो.
रविवारी रात्री आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवावा व तेच उद्यापन समजावे. पारायण करताना दिवा तेवत ठेवावा. रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व पैसे ठेवावेत. शैव संप्रदायी साधूला कमीत कमी २१ रुपयांची दक्षिणा व पांढरेशुभ्र वस्त्र दान द्यावे. पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल. इतरांनीही ऐकावी. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर १०८ वेळा ॐ नम: शिवाय या मंत्राचा जप करावा (जमल्यास रोज जप करावा).
फक्त अकरावा अध्याय रोज तीनदा पठन करावे. अकराव्या अध्यायाच्या केवळ श्रवणानेही एकादश रूद्र प्रसन्न होतात आणि रुद्रपाठाचे पुण्य मिळते. तसेच 42 ओव्या पठण करावे अध्याय १५ मध्ये दिलेल्या 42 ओव्यांचे नित्य पठण केले जाते. ज्यांना वेळेअभावी वा इतर काही कारणांमुळे ग्रंथ पठण करता येत नाही त्यांच्यासाठी या ओव्या कामी येतात. रोज सकाळी स्नान करून या ४२ ओव्या वाचाव्यात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: श्रीधर स्वामी यांनी 1719 साली शिवलीलामृत ग्रंथाची रचना केली.
Ans: एकदिवसीय किंवा सप्ताह (७ दिवस) पारायण पद्धतीने ग्रंथ वाचला जातो. स्नान करून स्वच्छतेने आणि शांत मनाने वाचन करणे महत्त्वाचे आहे.
Ans: मनःशांती, सकारात्मक ऊर्जा, इच्छा पूर्ण होणे आणि शिवकृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.






