फोटो सौजन्य- pinterest
श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार उद्या म्हणजे 25 जुलै रोजी आहे. या दिवशी सूर्य देव कर्क राशीत असेल आणि चंद्र कर्क राशीत असेल. शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो. यावेळी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रावणातील शुक्रवारचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी महिला उपवास देखील करतात. पंचांगानुसार, या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल आणि त्याची समाप्ती दुपारी 12.55 वाजता होईल. त्याचसोबत राहू काळ सकाळी 10.45 ते दुपारी 12.28 पर्यंत असेल. या दिवशी वृद्धी योग सायंकाळी 7.28 वाजता सुरु होऊन रात्रभर राहील.
शुक्रवारचा उपवास प्रामुख्याने संतोषी माता आणि देवी लक्ष्मीला समर्पित असतो. मात्र श्रावणातल्या शुक्रवारचे व्रत हे जिवतीला समर्पित आहे. असे म्हटले जाते की, हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी, संपत्ती आणि शांती मिळते. तसेच या वेळी विधीनुसार पूजा केल्याने सर्व दुःखे नष्ट होऊन देवी तिच्या भक्तांचे सर्व संकटांपासून रक्षण करते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते, अशी मान्यता आहे.
शुक्रवारी हे व्रत केल्याने शुक्र ग्रहाला बळकटी मिळते. तसेच त्याच्या संबंधित काही दोष असल्यास ते दूर होण्यासही मदत होते. हे व्रत कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या शुक्रवारपासून सुरू करता येते. सहसा हे व्रत सलग 16 शुक्रवार पाळले जाते, त्यानंतर उद्यापन केले जाते.
शुक्रवारी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करुन झाल्यानंतर देव्हाऱ्याची साफसफाई करुन घ्यावी.
त्यानंतर एका पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ कापड पसरावे आणि त्यावर पूजेचे साहित्य ठेवावे. त्यानंतर देवीची मूर्ती ठेवून कलशाची स्थापना करावी.
यावेळी श्री यंत्रांची स्थापना करणे देखील शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीला सिंदूर, तांदूळ, फुले आणि माळ अर्पण करुन तुपाचा दिवा लावा आणि धूप अर्पण करावे. देवीला फळे अर्पण करावे.
त्यानंतर व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी. नंतर मंत्रांचा जप करुन आरती करावी. पूजा करुन झाल्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन ते घरभर शिंपडावे आणि नंतर ते पाणी तुळशीला अर्पण करावे.
देवीची पूजा झाल्यांतर देवीला खीर आणि पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. लक्ष्मी मंत्राचा जप करावा. पूजा करताना देवी लक्ष्मीला पिवळ्या कढई अर्पण करा. पूजा संपल्यानंतर त्या तिजोरीत ठेवा. तुमच्या संपत्तीत वाढ होईल.
मान्यतेनुसार, शुक्रवारी जर तुम्ही देवीच्या व्रताचा उपवास करत असाल मिठाचा वापर करु नये.
तुम्ही दिवसातून एकदा गोड पदार्थासोबत कोणतेही एक धान्य खाऊ शकता, जसे की खीर-पुरी.
शुक्रवारी जर कोणी व्रत ठेवले असल्यास त्या दिवशी घरातील सदस्यांनी कांदा, लसूण, मांस, मद्य इत्यादी मांसाहारी पदार्थांचे सेवन करू नये.
या दिवशी ब्राह्मण, गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करावे आणि त्यांना दक्षिणा देणे देखील शुभ मानले जाते.
शुक्रवारच्या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार, तांदूळ, पांढरे कपडे, साखर, दूध इत्यादी गोष्टींचे दान करणे देखील चांगले मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)