फोटो सौजन्य: Pinterest
“भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” असं अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कायमच कोणत्या ना कोणत्या रुपात सांगत असतात. असं म्हणतात की स्वामींचा आशिर्वाद त्यांच्या भक्तांवर कायमच असतो. याच भक्तांना संकटांचं आव्हान पेलण्यासाठी स्वामींनी तारकमंत्र लिहिला होता. तारकमंत्र म्हणजे काय ? स्वामी समर्थांनी तारकमंत्र लिहिण्याचं कारण काय ते आज जाणून घेऊयात.
ताकरमंत्र या एका शब्दातचं त्याचा अर्थ देखील सामावलेला आहे. तारक म्हणजे तारणहार म्हणजेच वाचवणारा किंवा सांभाळणारा. असा हा मंत्र म्हणजे तारकमंत्र. स्वामींनी हा मंत्र भक्तांसाठी लिहिला म्हणून त्याला स्वामी समर्थांचा तारकमंत्र असं म्हणतात. हिंदू पुराण ग्रंथांनुसार असं मानलं जातं की स्वामी समर्थ हे अनंतकोटी ब्रम्हांडनायक आहेत. त्यामुळे त्यांची कृपा त्यांच्या भक्तांवर कायमच असते.
या तारकमंत्राचा अर्थ काय ?
नि:शंक हो निर्भय हो मना रे।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।।
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ।
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।
तारकमंत्राच्या सुरुतीच्या या ओळींचा अर्थ असा की, अडचणीत सापडलेल्या भक्तांना स्वामी सांगतात की, हे भक्ता, तू अनेक समस्यांनी ग्रासलेला असलास की मनात कोणताही संशय ठेऊ नकोस आणि संकटांचा सामना तू तेव्हाच करु शकतो जेव्हा तू त्यांना न घाबरता धीराने सामोरा जाशील. तुझ्या या .युद्धात स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत. तू आम्हाला कोणत्याही देवळात शोधू नकोस आम्ही तुझ्या अंतरात्म्यात आहोत. तू तुझ्या सत्कर्मावर विश्वास ठेव, तुझ्या प्रमाणिकपणाने तुला अशक्य वाटणारं ध्येय ही साध्य होईल.
जिथे स्वामिपाय तिथे न्यून काय ।
स्वये भक्त – प्रारब्ध घडवी हि माय ।।
आज्ञेविणा ना काळ ना नेई त्याला ।
परलोकीही ना भीती त्याला ।।२।।
स्वामी चरणांशी कधीही कोणता दुजाभाव होत नाही. तुमचं नशिब हे तुमच्या कर्माने बदलतं आणि स्वामींच्या साथीने ते नशीब देखील पालटतं. जन्म आणि मृत्यू ही आयुष्याची दोन महत्त्वाची बिंदू आहेत. मात्र स्वामींच्या आज्ञेशिवाय काळ देखील आयुष्य हिरावून घेऊ शकत नाही. त्याचबरोबर मृत्यू आल्यानंतर ही परलोकी जगात स्वामी सदैव साथ देतात.
उगाची भितोसी भय हें पळू दे ।
जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे ।
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा ।
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ।।३।।
या जगात विनाकारण काही होत नाही. त्यामुळे तू कशाला घाबरु नकोस. स्वामीशक्ती तुझ्या जवळ उभी असताना तुला घाबरण्यातचं कारण नाही. स्वामी आपल्या भक्तांना आपली मुलं समजतात त्यांच्या वर प्रेम करतात. ते माय बाप असल्याने सदैव सोबत आहेत.
खरा होई जागा । श्रद्धेसहीत ।
कसा होशी त्याविन तू स्वामीभक्त ।।
कितीदा दिला बोल त्यांनीच हात ।
नको डगमगू । स्वामी देतील साथ ।।४।।
जोवर विश्वास आणि श्रद्धा ठेवत नाही तोवर स्वामींचं अस्तित्व तुला जाणवणार नाही. आजवर त्यांनी अनेक संकाटातून तारलं आहे. यापुढे ही तेच तारतील.
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ ।
स्वामीच या पंच प्राणामृतात ।।
हे तीर्थ घे आठवी रे प्रचीति ।
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ।।५।।
स्वामी भव्य दिव्य पुजेने प्रसन्न होतात असं नाही. भक्तांनी मनापासून केलंलं नामस्मरण देखील त्यांच्यापर्यंत पोहोचतं. ज्याचं सत्कर्म चांगलं आहे अशा भक्तांची साथ स्वामी कधीच सोडत नाही. असा या तारकमंत्राचा अर्थ आहे.
पुरणातील ग्रंथांच्या आधारानुसार, असं म्हटलं जातं की, स्वामींनी आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी तारकमंत्र लिहिला आहे. या तारकमंत्राने प्रत्येकाच्या मनात एक सकारात्मक भाव जागृत होतो आणि आलेल्या संकंटांशी लढण्याचं बळ मिळतं. याच हेतूस्तव स्वामी समर्थांनी हा ताकमंत्र लिहिला आहे.