(फोटो सौजन्य – X)
अलकनंदा आकाशगंगा पृथ्वीपासून सुमारे १२ अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे. तिचा रेडशिफ्ट सुमारे ४ असल्याने तिचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला १२ अब्ज वर्षे लागली आहेत. त्यामुळे आपण तिला विश्वाच्या अत्यंत प्रारंभीच्या काळात जशी होती तशी पाहत आहोत. अलकनंदा नदीवरून या आकाशगंगेला नाव देण्यात आले आहे.
अनेक तपशील उघडकीस
जेडब्ल्यूएसटीच्या इनफ्रारेड क्षमतेमुळे या आकाशगंगेचे अनेक तपशील उघडकीस आले आहेत. तिच्यात १० अब्ज सूर्याच्या वस्तुमानाइतके तारे आहेत. मिल्की वेपेक्षा अनेकपट जलद अशी दरवर्षी ६३ सूर्याएवढी ताऱ्यांची निर्मिती होते. दोन सुंदर सर्पिल बाहू, तेजस्वी मध्यभाग आणि एका माळेवर रचलेल्या मणी स्वरूपातील ताऱ्यांचे समूह तिची रचना अधिक आकर्षक बनवतात. सुमारे ३० हजार प्रकाशवर्षाच्या व्यासाची ही आकाशगंगा विश्वाच्या इतिहासासाठी ‘अतिशय परिपक्व दिसते. पूर्वीचे खगोलशास्त्रीय सिद्धांत सांगतात की प्रारंभीच्या विश्वात आकाशगंगा अस्ताव्यस्त, ढवळाढवळयुक्त असाव्यात, पण अलकनंदा त्या धारणेला आव्हान देत आहे.
विश्वाचे नवे आकलन
काहीशे दशलक्ष वर्षांत इतकी मोठी आणि स्थिर डिस्क तयार होणे हे विद्यमान मॉडेल्सना प्रश्न पडेल असेच आहे. या निरीक्षणात जेडब्ल्यूएसटीची उच्च स्पष्टता आणि अबेल २७४४ या विशाल गॅलेक्सी क्लस्टरमुळे मिळालेल्या गुरुत्वीय लेन्सिंगचा मोठा वाटा आहे. संशोधक लवकरच पुढील निरीक्षणांद्वारे अलकनंदा गरम की थंड डिस्क आहे हे तपासणार आहेत. हा शोध प्रारंभीच्या विश्वाच्या विकासाविषयीचे आकलन नव्याने घडवू शकतो.






