Child Abuse Awareness:बाललैंगिक अत्याचार, 'पेडोफिलिक डिसऑर्डर' आणि विकृतीची कारणे; आरोपींचे मानसशास्त्रीय पॅटर्न कसे ओळखाल?
Special Interview अनुराधा धावडे। नवराष्ट्र पुणे : पुण्यातील भोर येथील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली, या घटनेपाठोपाठ पुण्यासह राज्यभरातूनही अशा घटना समोर आल्याने आक्रोश वाढत गेला. बालकांवरील वाढत्या अत्याचारांच्या या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या सगळ्या घटनांवर नवराष्ट्र’ने पुणे जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्चन्यायालयात कार्यरत अॅड. सनी नाईक यांच्याशी संवाद साधला. अॅड. नाईक यांनी समाजात अशा प्रकारच्या बालिकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना आणि नराधमांच्या प्रवृत्ती कशा ओळखाव्यात आणि अशा घटना रोखण्यासाठी समाजानेच कशी खबरदारी घ्यावी, यांसंदर्भात बातचीत केली. (Child Abuse Awareness)
संतापजनक! ४ वर्षांच्या निरागस कळीला नराधमाने खुडले; समाज म्हणून …
हो, नक्कीच. अशा आरोपींमध्ये ‘ग्रूमिंग’ (Grooming) हा एक स्पष्ट मानसशास्त्रीय पॅटर्न दिसतो. ज्यामध्ये ते आधी चॉकलेट, गिफ्ट, मदत आणि प्रेमळ वागणूक देऊन मुलाचा विश्वास जिंकतात, नंतर त्या विश्वासाचा गैरवापर करतात. दुसरा पॅटर्न म्हणजे हे आरोपी बाहेरून पूर्णपणे सामान्य व्यक्तीप्रमाणे वागतात. विशेष बाब म्हणजे, कुटुंबातील सदस्य, ओळखीचे किंवा विश्वासार्ह व्यक्ती म्हणूनच समोर येतात, ज्यामुळे POCSO Act, 2012 च्या कलम 9 (1) मध्ये विश्वस्त स्थिती (Trust Position) मधील गुन्हे गंभीर मानले जातात. तिसरा पॅटर्न म्हणजे लहान मुलांना अशा आरोपींच्या वर्तनातील सूक्ष्म बदल समजत नसल्याने हे गुन्हेगार दीर्घकाळ लपून राहतात, पण न्यायालयामध्ये हे ग्रूमिंग पॅटर्न, आरोपींची कार्यपद्धती (Modus Operandi) पुरावा म्हणून वापरला जातो आणि ‘गुन्हेगारी हेतू’ सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. १
अशा प्रवृत्तीचे लोक आजुबाजूला असल्यास मुलांच्या वागणुकीत अचानक बदल दिसतो. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या संपर्कात यायला घाबरणे, अचानक शांत किंवा एकटे राहणे पसंत करणे, झोपेचे विकार, अचानक राग येणे किंवा अनावश्यक भीती वाटणे. शारीरिक लक्षणांमध्ये जननेंद्रियांच्या भागावर जखमा, वेदना किंवा संसर्ग दिसू शकतो; काही मुलांना गोष्टी ‘सीक्रेट’ (गुप्त) ठेवण्याची सवय लावली जाते; किंवा काही मुले ‘गुड टच-बँड टच’मध्ये गोंधळून जातात. हे लक्षण पोस्को न्यायालात (POCSO Court) पुरावा (Corroborative Evidence) म्हणून वापरले जातात. पण कलम २९ अंतर्गत मुलांनी स्वतःहून साक्ष देणे याला विशेष प्राधान्य दिले जाते. कलम ३६ नुसार ‘Delay in Reporting’ हा आरोपीच्या बाजूने वापरता येत नाही.
आरोपींमध्ये अशी विकृती बळावण्याची कारणे बहुआयामी असतात, अशा प्रकरणातील काही आरोपी हे स्वतःच बालपणी लैंगिक शोषणाला बळी पडलेले असतात. (Childhood Sexual Abuse) ज्यांना पीडित ते आरोपी (Vic-tim-to-Offender Cycle) म्हणून ओळखले जाते. काहींमध्ये पेडोफिलिक डिसऑर्डर (Pedophilic Disorder) हा मानसशास्त्रीय विकार असतो, ज्यामध्ये प्रौढ व्यक्तीला लहान मुलांप्रती लैंगिक आकर्षण असते. काहींमध्ये नियंत्रणाची भूक (Power and Control) अपूर्णतेची भावना, सामाजिक हीनतेचा अनुभव किंवा प्रौढांशी तुलना करताना अपयशी वाटल्यावर त्यांना मुलांवर नियंत्रण मिळवणे सोपे वाटते.
काहीं आरोपींमध्ये ‘Cognitive Distortion’भावना असते. म्हणजे, ते त्यांच्या कृत्यामुळे ‘मुलांना त्रास होत नाही’, ‘हे प्रेम आहे’ असे स्वतःचीच समजूत करून घेतात. याशिवाय काही आरोपींमध्ये अंमली पदार्थांचा अति वापर आणि इंटरनेटवर अगदी सहजासहजी मिळणारे पॉर्नोग्राफीचे व्यसन अशा विकृतीला बळ देते. POCSO Act, २०१२ च्या कलम ३ ते ६ अंतर्गत ‘अशा गुन्हेगारांचे गुन्हे सिद्ध झाल्यावर शिक्षा निश्चित होते आणि आरोपीचे व्यसन न्यायालयात बचाव तंत्रासाठी स्वीकारले जात नाही.
हो, उपचार होऊ शकतात, पण कायदेशीर दृष्टिकोनातून हे ‘Treatment’ नव्हे तर ‘Correctional Intervention’ (करेक्शनल इंटरवेन्शन) म्हणून ओळखले जाते; POCSO Act, २०१२ च्या कलम ४ मध्ये न्यायालयाला आरोपीला योग्य उपचार (Appropriate Treatment) देण्याची शिफारस करण्याचे अधिकार आहेत. लैंगिक गुन्ह्यातील आरोपीवर उपचार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, यात ‘Cognitive Behavioral Therapy’ (CBT), ‘Aversion Therapy’ आणि ‘Group Counseling’ या पद्धती ‘Reformation’ साठी वापरल्या जातात, पण ‘गुन्ह्यांची’ पुनरावृत्ती अत्यंत अधिक असल्यास न्यायालय आरोपीला जामीन देण्यास किंवा कोणत्या सवलती देतानाही अत्यंत काळजी घेते.






