‘धवल लक्ष्मी’ पोहोचली ओमानच्या किनारी (फोटो- सोशल मिडिया)
नोव्हेंबर २०२५ मध्ये धवल लक्ष्मीला समुद्रात सोडण्यात आले
समुद्री कासव संवर्धन मोहिमेसाठी उपग्रह प्रक्षेपकाची मदत
‘धवल लक्ष्मी’ने पूर्ण केला हजारो किमीचा प्रवास
सुनयना सोनवणे / पुणे: डहाणू किनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडून उपचारानंतर समुद्रात सोडण्यात आलेल्या ‘धवल लक्ष्मी’ या ऑलिव्ह रिडले कासवाने तब्बल ३,५०० किलोमीटरचा अरबी समुद्रातील प्रवास पूर्ण करत ओमानच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रापर्यंत मजल मारली आहे. उपग्रह प्रक्षेपकाद्वारे नोंदविण्यात आलेला हा प्रवास महाराष्ट्रातील समुद्री कासव संवर्धन (Navarashtra Special) मोहिमेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, सध्या हे कासव पुन्हा भारतीय समुद्रसीमेच्या दिशेने परतताना दिसत आहे.
डहाणू टर्टल रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार घेतल्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये धवल लक्ष्मीला समुद्रात सोडण्यात आले होते. भारतीय वन्यजीव संस्था ( डब्ल्यूआयआय) आणि मँग्रोव्ह फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत तिच्या कवचावर सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आला होता. महाराष्ट्रातील ट्रॅक करण्यात आलेल्या आठ कासवांपैकी खोल समुद्राचा मार्ग स्वीकारणारे हे एकमेव कासव ठरले आहे.
सुरुवातीला किनाऱ्यालगत फिरणाऱ्या धवल लक्ष्मीने नंतर अरबी समुद्राच्या खोल भागाकडे कूच केली. जानेवारीपर्यंत ती भारतीय किनाऱ्यापासून ७०० किलोमीटर दूर गेली होती. फेब्रुवारीमध्ये ती मुंबईपेक्षा ओमानच्या अधिक जवळ पोहोचली. २६ फेब्रुवारी रोजी तिचे स्थान ओमानच्या मसिरा बेटापासून अवघ्या १६० किलोमीटर अंतरावर नोंदविण्यात आले. हे बेट समुद्री कासवांच्या अंडी घालण्याच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक मानले जाते. यानंतर धवल लक्ष्मीने अचानक यू-टर्न घेत पुन्हा ईशान्य दिशेने प्रवास सुरू केला. काही काळ ती अरबी समुद्राच्या मध्यभागी राहून जेलीफिश आणि समुद्री शेवाळ यांसारख्या खाद्यासाठी खोल डुबक्या मारत होती. आता ती महाराष्ट्र किनाऱ्याकडे परतताना दिसत असली, तरी अंडी घालण्याचा हंगाम नसल्याने ती किनाऱ्यावर येण्याची शक्यता कमी असल्याचे संशोधकांनी सांगितले.
ऑलिव्ह रिडले कासव हे जगभरातील महासागरांमध्ये आढळतात. भारतात मोठ्या प्रमाणावर अंडी घालण्याची घटना प्रामुख्याने ओडिशातील काही समुद्रकिनाऱ्यांवर दिसते. भारतीय महासागरातील त्यांच्या स्थलांतराबद्दल अद्याप मर्यादित माहिती उपलब्ध असल्याने अशा उपग्रह ट्रॅकिंग प्रकल्पांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्रात २०२२ आणि २०२३ मध्ये आणखी सात कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आले होते. या कासवांनी १,०१५ ते ५,२६७ किलोमीटर अंतर पार केले असून त्यांचा सरासरी वेग ताशी १.१ किलोमीटर इतका नोंदविण्यात आला आहे. ‘बागेश्री’ नावाच्या एका कासवाने श्रीलंका पार करून बंगालच्या उपसागरात प्रवेश केला होता, तर दुसरे कासव लक्षद्वीपपर्यंत पोहोचले होते.
संशोधकांच्या मते, या अभ्यासातून ऑलिव्ह रिडले कासवांचे अरबी समुद्रात वास्तव्य करणारी कासवे आणि श्रीलंका व बंगालच्या उपसागरालगतच्या समुद्रातून येणारी कासवे असे दोन संभाव्य गट असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे भविष्यात समुद्री जैवविविधतेच्या अभ्यासासाठी या प्रकल्पातून महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘जखमी कासवांवर उपचार करून समुद्रात सोडल्यानंतर त्यांचे पुढे काय होते, हे सहसा समजत नाही. त्यामुळे धवल लक्ष्मीचा हा प्रवास पुनर्वसन मोहिमेच्या दृष्टीने मोठे यश आहे.’
– सुरेश कुमार, शास्त्रज्ञ, भारतीय वन्यजीव संस्था
‘धवल लक्ष्मी’चा समुद्री प्रवास –
– ऑगस्ट २०२५ – डहाणू किनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडली.
– २० नोव्हेंबर २०२५ – उपचारानंतर समुद्रात सोडले.
– २६ फेब्रुवारी २०२६ – ओमानच्या मसिरा बेटाजवळ पोहोचली.
– एकूण प्रवास : सुमारे ३,५०० किमी
– मसिरा बेटापासूनचे अंतर : १६० किमी
– भारतीय किनाऱ्यापासून कमाल अंतर : ७०० किमीपेक्षा अधिक
– ट्रॅकिंग संस्था : भारतीय वन्यजीव संस्था आणि मँग्रोव्ह फाउंडेशन
रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ किनाऱ्यांवर १७९ कासव घरटी; 66 पिल्ले समुद्राकडे मार्गस्थ
महाराष्ट्रातील कासव संवर्धन –
– महाराष्ट्रातील पहिले कासव बचाव केंद्र : २०१३
– राज्यातील ५० समुद्रकिनाऱ्यांवर संरक्षण उपक्रम
– २०२४-२५ मध्ये कोकणात १.७ लाख कासव पिल्लांची नोंद
– मच्छीमार नुकसानभरपाई योजनेतून ४५० हून अधिक कासवे समुद्रात सोडली
– स्वयंसेवक, ग्रामस्थ आणि वन विभागाचा संयुक्त सहभाग






