फोटो - सोशल मीडिया
प्रिती माने : पुणे शहर मुठा नदीच्या तिरावर वसले आहे. आता नदीचे आणि शहराचे रुपडे पालटले असले तरी काही आठवणी आजही तशाच आहेत. मुठा नदीच्या किनाऱ्यावर ओंकारेश्वर मंदिरासारखी अनेक मंदिर वसलेली आहे. आता धरणामुळे नदीचं पात्र कमी झालं असल्यामुळे रस्ता वाढला आहे. पण पूर्वी नदीच्या किनाऱ्यावर मातीचा गणपती मंदिर होते. पुण्यातील नावाप्रमाणे मातीचाच असणारा या मातीचा गणपतीला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे.
मुठा नदीच्या किनाऱ्यावर मातीचा गणपतीचे मंदिर होते. सध्या केळकर रोडवर नारायण पेठ पोलिस चौकीच्या पुढे डाव्या बाजूला हे मातीचा गणपती मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर एक जुनी दगडी दीपमाळ दिसते. ही दिपमाळ मंदिराची खूण समजू शकतो. तिथेच माती गणपतीचे सुंदर आणि पुरातन मंदिर आहे. मंदिराला गणराय मातीचा असल्यामुळे या गणपतीला मातीचाच गणपती म्हणून ओळखले जाते. गणरायाचे निस्सिम भक्त असलेल्या मोरया गोसावी यांच्या सूचनेने लहान मुलांनी ही गणरायाची मूर्ती घडवण्यात आल्याची आख्यायिका देखील सांगितली जाते. तसेच ही मूर्ती मुठा नदीच्या पात्रातील मातीमध्ये शिवरामपंथ श्रोत्री या गृहस्थांना सापडली असल्याचे देखील म्हटले जाते.
मातीचा गणपती मंदिर पेशवेकालीन आहे. पेशव्यांच्या काळापासून हा गणपती अस्तित्वात आहे. या मंदिराचा उल्लेख पेशवाईत देखील मिळतो. सवाई माधवराव पेशव्यांच्या जन्मानंतर पुण्याच्या अनेक देवळांमध्ये दक्षिणा ठेवल्या गेल्या तेव्हा याही मंदिराला दक्षिणा देण्यात आली होती. आता मंदिराचे स्वरुप पक्के असून मंदिराला सभागृह, मंडप आणि गाभार आहे. पूर्वी मात्र मातीचा गणपती मंदिर कौलारु होते. शिवरामपंथ श्रोत्री यांना मूर्ती सापडल्यानंतर त्यांच्या हस्ते गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आताही मंदिराचा मालकी हक्क श्रोत्री कुटुंबाकडेच आहे. या मंदिराला पानशेतच्या पुराचा फटका बसला होता. मंदिराच्या कळसापर्यंत पाणी शिरले होते. मात्र मंदिरातील मूर्ती मातीची असून देखील मूर्तीला काहीच झाले नव्हते.
मातीच्या गणरायाची ही सुंदर मूर्ती मातीच आहे. त्यावर शेंदूर लेपन केलेले आहे. गणरायाची ही चतुर्भूज मूर्ती साधारणतः चार फुटांची आहे. गणरायाची ही मूर्ती गाभाऱ्यामध्ये पितळी देव्हाऱ्यात स्थापन करण्यात आली आहे. गणेशाची सोंड डाव्या बाजूला आहे. मूर्तीच्या वरच्या डाव्या हातात फुल असून उजवा हात अभय देणारा आहे. तर खालच्या हातात परशू आणि खालचा डावा हात गुडघ्यावर ठेवलेला आहे. याच हातावर सोंड देखील टेकली आहे. मातीचा गणपती पुण्याच्या ऐतिहासिक मंदिरांपैकी एक असून आपले वेगळेपण टिकवून आहे.