National Astronaut Day : 'ॲलन शेपर्डपासून ते गगनयानपर्यंत' पाहा जागतिक आणि भारतीय अंतराळ क्षेत्राचा प्रेरणादायी प्रवास ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
National Astronaut Day 2025 : 5 मे हा दिवस जागतिक अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा म्हणून साजरा केला जातो. 1961 साली याच दिवशी, ॲलन बार्टलेट शेपर्ड ज्युनियर यांनी ‘फ्रीडम 7’ अंतराळयानातून उड्डाण करत अमेरिकेचे पहिले अंतराळवीर होण्याचा बहुमान पटकावला. हे ऐतिहासिक उड्डाण केवळ 15 मिनिटांचे असले, तरी त्यात शेपर्ड यांनी 116 मैल उंचीवर जाऊन 302 मैलांचे अंतर पार केले. जरी ही एक उपकक्षीय मोहीम होती, तरीही यामुळे अमेरिकेच्या अंतराळ कार्यक्रमाला एक नवसंजीवनी मिळाली आणि जागतिक स्पर्धेत अमेरिका प्रभावीपणे उतरली.
या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ, 20216 मध्ये युनिफी स्पेस एजन्सीने 5 मे ‘राष्ट्रीय अंतराळवीर दिन’ म्हणून घोषित केला. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे अंतराळवीरांच्या कथा तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे, त्यांच्यात विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे आणि ‘ताऱ्यांपलीकडची स्वप्ने’ पाहण्यास प्रेरणा देणे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानकडून भारतावर सायबर हल्ल्यांचे सत्र सुरूच; आत्तापर्यंत देशाचे ‘इतके’ नुकसान
अमेरिकेच्या या यशाचा प्रभाव जागतिक पातळीवर जाणवला आणि भारतालाही अंतराळात स्वतःची छाप सोडण्याची प्रेरणा मिळाली. 1975 मध्ये भारताने ‘आर्यभट्ट’ या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणाने अंतराळ क्षेत्रात आपली पावले टाकली. त्यानंतर इस्रोने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) सतत प्रगती साधत भारताला जागतिक स्तरावर एक विश्वासार्ह आणि प्रगत अंतराळशक्ती म्हणून स्थान मिळवून दिले.
१. चंद्रयान मोहीम – 2008 मध्ये ‘चंद्रयान-1’ द्वारे चंद्रावर पाण्याचे पुरावे शोधून इस्रोने वैज्ञानिक विश्वात खळबळ माजवली. पुढे 2019 मध्ये ‘चंद्रयान-2’ आणि 2023 मध्ये ‘चंद्रयान-3’ मोहिमा पाठवण्यात आल्या.
२. मंगळयान (2014) – भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यान यशस्वीरित्या स्थिरावून इतिहास रचला. कमी खर्चात उच्च दर्जाची मोहीम राबविणारे भारत हे पहिले राष्ट्र ठरले.
३. गगनयान मोहीम (2025) – भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असून यात भारतीय अंतराळवीरांना (व्योमनॉट) अवकाशात पाठवले जाणार आहे. हे इस्रोसाठी आणि संपूर्ण देशासाठी एक ऐतिहासिक पाऊल असेल.
४. NavIC प्रणाली – अमेरिकन GPS च्या तोडीसतोड स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली 2016 मध्ये सुरू झाली. ही प्रणाली संरक्षण, वाहतूक आणि आपत्कालीन सेवांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
५. पीएसएलव्ही व जीएसएलव्ही – इस्रोने स्वतःची प्रक्षेपण वाहने विकसित केली असून, ‘पीएसएलव्ही’ ला आज ‘वर्कहॉर्स’ म्हणून ओळखले जाते. 2017 मध्ये एका प्रक्षेपणातून 104 उपग्रह सोडण्याचा विक्रमही इस्रोने नोंदवला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताचा ‘हा’ सिक्रेट एअरबेस म्हणजे पाकिस्तानच्या घशात अडकलेला काटा, का? ते जाणून घ्या
‘GSLV मार्क III’ हे इस्रोचे सर्वात शक्तिशाली प्रक्षेपण वाहन असून ‘गगनयान’सारख्या मानवयुक्त मोहिमांसाठी तयार करण्यात आले आहे. दुसरीकडे, ‘आदित्य-L1’ ही भारताची पहिली सौर मोहीम असून, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ती 2024 मध्ये सुरू करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय अंतराळवीर दिन आपल्याला केवळ अतीताच्या यशाची आठवण करून देत नाही, तर भविष्याच्या अनंत शक्यता दाखवतो. ॲलन शेपर्डपासून ते गगनयानापर्यंतचा प्रवास ही एक प्रेरणादायक कहाणी आहे. अशक्याला शक्य करण्याची. भारताच्या अंतराळ मोहिमा, त्यातील वैज्ञानिक यश आणि तांत्रिक कौशल्य हे आजच्या तरुण पिढीसाठी दिशादर्शक आहेत. अंतराळ हा केवळ संशोधनाचा नव्हे, तर मानवी जिज्ञासेचा सर्वोच्च शिखर गाठण्याचा प्रवास आहे. ज्यात भारत आता आत्मविश्वासाने पुढे चालला आहे.